नगर शहरासह सावेडीत महिलांच्या गळ्यातील चेनस्नॅचिंगचे प्रकार सुरुच

0
17

नगर – नगर शहर परिसरात गेल्या महिनाभरापासून चेन स्नॅचिंग करणार्‍या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मार्केट यार्ड, तारकपूर, केडगाव बायपास, सिव्हिल हडको परिसरात घडलेल्या घटना ताज्या असताना सोमवारी (दि.२९) सकाळी सावेडी उपनगरातील भिस्तभाग रोडवरील वृंदावन कॉलनीत एका पाठोपाठ २ महिलांच्या गळ्यातील दागिने विना क्रमांकाच्या मोटारसायकलवर आलेल्या एका चोरट्याने चोरून नेले आहे. त्यामुळे या चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. या चेन स्नॅचिंगच्या २ घटनांबाबत २ महिलांनी तोफखाना पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या फिर्यादी दिल्या आहेत. यातील पहिली फिर्याद गीता मुकुंद देशमुख (रा. श्रीनाथ कॉलनी, रासनेनगर, सावेडी) यांनी दिली आहे. त्या सोमवारी सकाळी ८.१० च्या सुमारास भिस्तबाग रोडवर पायी जात असताना त्यांच्या समोरून एका विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर एक जण आला. त्याने अचानक त्यांच्या जवळ मोटारसायकल नेत त्यांच्या गळ्यातील १ तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून तोडून ते घेवून तो भरधाव वेगात निघून गेला. हा सर्व प्रकार अचानक घडल्याने फिर्यादी काही काळ गोंधळून गेल्या. त्यांनी आरडाओरडा केला मात्र नागरिक जमा होईपर्यंत चोरटा पसार झाला होता. दुसरी फिर्याद रंजना विलास जतकर (रा. अशोक नगर, कलानगर जवळ, सावेडी) यांनी दिली आहे. त्या सोमवारी सकाळी ८.१० च्या सुमारास भिस्तबाग रोडवरील वृंदावन कॉलनीतील रस्त्याने मोपेडवर घराकडे चाललेल्या असताना त्यांच्या पाठीमागून एका विना क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर एक जण भरधाव वेगात आला. त्यांच्या जवळ आल्यावर त्याने मोटारसायकलचा वेग कमी करत त्यांच्या गळ्यातील १ तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून तोडून ते घेवून तो भरधाव वेगात निघून गेला. या दोन्ही फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.कलम ३९२ प्रमाणे २ स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. चोरटा एकच की अनेक याचा शोध घ्यावा लागणार नगर शहर परिसरात गेल्या महिनाभरापासून चेन स्नॅचिंगच्या घटना वारंवार घडत आहेत. रस्त्याने चाललेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने हे चोरटे हिसका मारून तोडून नेत आहेत. काही दिवसांपूर्वी मार्केटयार्ड मागील चैतन्य कॉलनीत सायंकाळी वॉकींगला चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सव्वादोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसुत्र पाठीमागून आलेल्या अनोळखी इसमाने बळजबरीने हिसका मारून तोडून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा तसाच काहीसा प्रकार तारकपूर परिसरात घडला. रस्त्याने पायी चाललेल्या शिक्षिकेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने पळविले. त्यानंतर केडगाव बायपास रस्त्याने मोपेडवर चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरट्याने हिसकावून नेली. २ दिवसांपूर्वी रविवारी (दि.२८) सकाळी सिव्हिल हडको परिसरात मोपेड वर चाललेल्या महिलेचे सोन्याचे गंठण चोरट्याने हिसकावून नेले होते. या सर्व घटनांमध्ये चोरटा एकच असल्याने त्याने एकट्यानेच या चोर्‍या केल्या की, असे अनेक चोरटे शहरात सक्रीय आहेत. याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. वारंवार होणार्‍या या घटनांमुळे शहर परिसरात महिलांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.