घोसपुरीच्या आखाड्यात रंगला लक्षवेधी कुस्त्यांचा थरार

0
28

नगर – नगर तालुक्यातील घोसपुरी येथील श्री पद्मावती देवी मातेच्या वार्षिक यात्रोत्सवा निमित्त शनिवारी (दि.२७) आयोजित करण्यात आलेल्या इनामी कुस्त्यांच्या आखाड्यात राज्यभरातील नामवंत मल्लांनी हजेरी लावत कुस्ती मल्ल विद्येतील आपले कसब दाखविले.यावेळी रंगलेल्या लक्षवेधी कुस्त्या पाहून उपस्थित कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटल्याचे दिसून आले. घोसपुरी येथील श्री पद्मावती देवस्थान जागृत असून येथील काच मंदिर सर्वत्र प्रसिद्ध आहे. देवीचा वर्षातून २ वेळा वार्षिक यात्रोत्सव होत असतो. यामध्ये नवरात्र आणि दुसरा यात्रोत्सव चैत्र पौर्णिमेच्या तिसऱ्या दिवशी होत असतो. यावर्षी शुक्रवारी यात्रोत्सव पार पडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इनामी कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला त्यासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा केली होती.

राज्यभरातील नामवंत मल्लांची हजेरी; कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटले

लोकवर्गणीद्वारे जमा केलेल्या पैशातून शनिवारी (दि.२७) इनामी कुस्त्यांचा आखाडा रंगला, रोख बक्षिसांचा वर्षाव उपस्थित मल्लांवर करण्यात आला. गावच्या लोकवर्गणी सह उपस्थित मान्यवरांनीही रोख बक्षिसे देत मल्लांचा उत्साह वाढविला.कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणेसह नगर जिल्ह्यातील तसेच हरियाणा येथील अनेक मल्ल या ठिकाणी आले होते. यावेळी अनेक कुस्त्या अतिशय रंगतदार झाल्या, मल्लांचे डाव – प्रतिडाव,चपळाई,कुस्ती मल्लविद्येतील कसब पाहून टाळ्या व शिट्ट्यांचा आवाज घुमत होता. यावेळी मानाच्या चांदीच्या गदा आदेश रायकर, अथर्व सांबर, आणि तेजस झरेकर या मल्लांनी जिंकल्या. या आखाड्यात गावातील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. आखाड्याचे समालोचन बारामतीचे प्रशांत भागवत यांनी केले. पंच म्हणून ज्ञानदेव झरेकर, सागर झरेकर, अविनाश भोसले, अजय वाळके यांनी काम पाहिले. लोकवर्गणी व आखाड्याच्या नियोजनासाठी यात्रा कमेटीसह ग्रामपंचायत व सोसायटीचे पदाधिकारी, सदस्य व गावातील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. या कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली होती.