नगरमध्ये सेल्समनची बॅग चोरणारे दोघे पुण्यात पकडले

0
24

चोरीचा ४८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत

नगर – गोडफ्रे फिलीप्स इंडिया लिमिटेल या कंपनीमध्ये सेल्समन म्हणुन काम करणार्‍या नगरमधील सेल्समनची विविध सिगारेटचे बॉस असलेली बॅग चोरून नेणार्‍या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिंपरी, पुणे येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ८ हजारांची रोकड व ४० हजार रुपये किमतीचे विविध सिगारेटचे बॉस असलेली बॅग असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सेल्समन मिराज मुमताज शेख (रा. मुकुंदनगर) हे २२ एप्रिलला नगर येथुन सुपा परिसरामध्ये सिगारेट विक्रीकरीता गेले होते. त्यांनी त्यांचेकडे असलेली सिगारेटची बॅग मोपेड मोटारसायकलवर ठेवुन सुपा येथील साई श्रध्दा किराणा स्टोअर्स या दुकानामध्ये गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी १ लाख ९ हजार ७०४ रुपये किमतीचे सिगारेट व रोख रक्कम असलेली बॅग चोरुन नेली होती. या बाबत सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, रविंद्र कर्डीले, अमृत आढाव, सागर ससाणे, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, संतोष खैरे, संभाजी कोतकर यांचे पथक तयार करुन तपासासाठी रवाना केले होते. या पथकाने सुपा परिसरामध्ये जावुन घटना ठिकाणीचे तसेच आजुबाजुचे परिसरातील सीसीटीव्ही फ ुटेजची पाहणी केली असता पथकास ४ इसम सिगारेटचे बॉस असलेली बॅग घेवून पुणेकडे जातांना दिसले.

सदर फुटेजमधील संशयीत इसमांची माहिती घेत असतांना फुटेजमधील एक इसम हा आकाश भवरसिंह राजपुत (रा. पुणे) असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीची माहिती काढत असतांना तो त्याचे साथीदासह त्यांचे राहते घरी आला असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पथकाने पुणे येथे जावुन आरोपी आकाश उर्फ बंटी भवरसिंह राजपुत (वय – २१, रा. विद्यानगर झोपडपट्टी मस्जिदजवळ, पिंपरी, पुणे) व रोहित मदन कुर्मी (वय – २४) यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी विशाल उर्फ बारया अनिल नलवडे (रा. रामनगर, पिंपरी चिंचवड, पुणे), रोहित छोटु भोसले (रा. रामनगर, पिंपरी चिंचवड, पुणे) यांचेसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. ते दोघे फरार आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडुन ८ हजारांची रोकड व ४० हजार ४०० रुपये किमतीचे सिगारेटचे बॉस असलेली बॅग असा एकुण ४८ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.