कलागुणांची जोपासना होण्यासाठी बाल संस्कार शिबिराची गरज : पवन नाईक

0
13

नगर – बाल संस्कार शिबिर म्हणजे संस्कार मूल्य अंगीकारून बालमनाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल असून मुलांमध्ये कला-गुणांची जोपासना होण्यासाठी आज अशा शिबिरांची खूपच गरज आहे. २९ वे वर्षे संस्कारमाला चालविली जात आहे, ही कौतुकाची बाब आहे. आपल्या मुलांसाठी शिबीर किती आवश्यक आहे हे पालकांच्या लक्षात घेऊन आपल्या पाल्याच्या आवडी-निवडी पाहून जास्तीत जास्त आनंदी व समाधानी राहण्यासाठी आपण पालक म्हणून किती सहभाग देतो याचा विचार पालकांनी करणे गरजेचे आहे. जी संस्कार मूल्ये शिबिर कालावधीमध्ये शिबिरार्थींनी आत्मसात केली आहे, त्याचे योग्य ते पालन करावे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय गायक पवन नाईक यांनी व्यक्त केले. रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती व राष्ट्र सेवा दल अहमदनगर यांनी आयोजित बाल संस्कार शिबीराच्या समारोपप्रसंगी रावसाहेब पटवर्धन व साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी समितीच्या उपाध्यक्षा शोभाताई ढेपे, सचिव अ‍ॅड. रवींद्र शितोळे, विश्वस्त सुहास अंतरकर, जगन्नाथ गुंड, दत्ता जंगम व सेवा दलाचे बापू जोशी, पुरुषोत्तम जाधव, भीमराज कोडम व दत्ता देवगावकर आदि उपस्थित होते.

रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती व राष्ट्र सेवा दलच्या बाल संस्कार शिबीराचा समारोप

संस्थेचे सचिव व संस्कारमालेचे संयोजक अ‍ॅड. रवींद्र शितोळे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात संस्थेच्यावतीने राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती सांगितली. माणुसकीचे दुत व शिबिर प्रमुख शिवाजी नाईकवाडी यांनी शिबिर कालावधी मधील वृत्तांत सादर केला. १४ ते २६ एप्रिल या शिबिर कालावधीत डॉ. कल्पना ठुबे, दिपाली देऊतकर, विनायक सापा, डॉ.अमित सपकाळ, उबाळे, शेलार, दत्ता देवगावकर, हर्षद कटारिया, प्रिया ओगले-जोशी, सुजाता वाऊत्रेय्सब्बन, संस्थेच्या उपाध्यक्षा शोभाताई ढेपे, अरुण आहेर, विवेक पवार, भीमराज कोडम, रमेश चिप्पा यांनी शिबिरार्थींना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शिबिरार्थींना व्यवहार कौशल्याचे ज्ञानमिळावे या उद्देशाने भाजी बाजार भरविण्यात आला. यावेळी पालकांनी मुलांना खूपच चांगले उत्तेजन दिले. माणसात माणूसपण पेरण्यासाठी हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही प्रार्थना सामुदायिक म्हणण्यात आली. तदनंतर शिबिरार्थी व पालक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समितीच्या उपाध्यक्षा शोभाताई ढेपे यांनी पालकांचे विशेष आभार मानून हा संस्काराचा ठेवा कायमस्वरूपी सर्वांनी जतन करून ठेवावा असे आवाहन त्यांनी केले. संस्थेचे विश्वस्त गणेश गावडे यांनी यापुढेही आपण सर्वांनी संस्थेच्या विविध उपक्रमात हिरीरीने सहभागी व्हावे. तसेच राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते व माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांच्या अथक प्रयत्नाने हे शिबिर खूपच यशस्वी झाले. पालकांचे देखील खूप सहकार्य मिळाले असे सांगितले.

शिबिर कालावधीमध्ये शिबिरार्थींनी आत्मसात केलेल्या कलागुणांचे सादरीकरण केले. पालक व शिबिरार्थी यांनी आपले शिबिरा बाबत मनोगत व्यक्त केले. पालकांनी मनोगत व्यक्त करताना सलग तेरा दिवस आमच्या पाल्यांना संस्काराची शिदोरी देणारे व सर्वात कमी प्रवेश फी घेऊन ज्ञानदान करणारे हे एकमेव असे शिबिर आहे. वर्षभर उजळणी शिबिर घेण्यात यावे अशी विनंती केली. शिबिरार्थी यांच्याकडून योगतज्ञ पुरुषोत्तम जाधव व अनघा राऊत यांनी योगा प्रात्यक्षिक करून घेतले. मतदार जागर हे पथनाट्य मुलींनी तर मुलांनी पाणी वाचवा हे पथनाट्य सादर केले. ‘स्वर्गात आकाशगंगा’ या गीतावर शिबिरार्थींनी लयबद्ध नृत्य सादर केले. पालकांनी सुद्धा त्या गाण्याचा मनमुराद आनंद घेतला. शिबिरार्थींनी आकर्षक असे कॅलेस्थेनिस कवायत, लाठी-काठीचे प्रात्यक्षिक सादर केले. तालबद्ध मयूर लेझीम सादर करून उपस्थितांची शिबिरार्थी व शिबिर सहाय्यक शिक्षक यांनी मने जिंकली. शिबीर यशस्वीतेसाठी राष्ट्र सेवा दलाच्या नेहा कर्डिले, साक्षी कर्डिले, संस्कृती कुलकर्णी, आर्या मिसाळ, नुपूर घटे, सार्थक भोंग, युवराज पाटील, ओम शिंदे, कृष्णा कर्डिले, आयुषा जाधव, गार्गी मदने, रिद्धी मदने व श्रीया पटवा व कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले. अशा सामाजिक दायित्व असलेल्या उपक्रमाबद्दल कौतुक केले. यापुढेही अशा उपक्रमास आम्ही सहकार्य करू असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा व साक्षी कर्डिले यांनी केले. शिबिरप्रमुख शिवाजी नाईकवाडी यांनी आभार मानले.