‘भाजप हटाव, देश बचाव’ चा नारा देत जनविरोधी सरकारचा पराभव करावा

0
9

महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी भाकप सरसावले; जिल्हा कौन्सिलच्या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना

नगर – भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जिल्हा कौन्सिलची बैठक जेष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. श्रीधर आदिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बुरुडगाव रोड येथील पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार निलेश लंके व शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना सक्रिय पाठिंबा देण्यात आला. तर जनविरोधी सरकारचा पराभव करण्यासाठी भाजप हटाव देश बचावचा नारा देऊन जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या उमेदवारांच्या प्रचारार्थ सूचना करण्यात आल्या. या बैठकीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. अ‍ॅड. सुभाष लांडे, जिल्हा सेक्रेटरी कॉ. ड. बन्सी सातपुते, जिल्हा सहसेक्रेटरी कॉ. अ‍ॅड. सुधिर टोकेकर, कॉ. कारभारी उगले, कॉ. बाबा आरगडे, कॉ. लक्ष्मण नवले, कॉ. बापूराव राशिनकर, कॉ. पांडुरंग शिंदे, कॉ. संतोष खोडदे, कॉ. संजय नांगरे, कॉ. सतिश पवार, कॉ. भारती न्यालपेल्ली, कॉ. सुरेश पानसरे, कॉ. प्रताप सहाने आदी उपस्थित होते.

कॉ.अ‍ॅड. सुभाष लांडे म्हणाले की, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने या पूर्वीच भारतीय जनता पक्षाचे जनविरोधी सरकारचा पराभव करण्यासाठी भाजप हटाव देश बचाव जनजागरण मोहीम हाती घेतली होती. आयटक कामगार संघटनेच्या वतीने कोल्हापूर ते नागपूर महासंघर्ष यात्रा काढून भाजपच्या कामगार शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करून ३४ जिल्ह्यातून महासंघर्ष यात्रा काढून नागपूर हिवाळी अधिवेशनावर ६० ते ७० हजार कामगार कर्मचार्‍यांनी महामोर्चा काढला होता. नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात २०१४ ला दिलेले एक ही आश्वासन पूर्ण झाले नसून, उलट शेतकरी व कामगार विरोधी धोरण घेऊन कार्पोरेट धार्जिणे धोरणे घेऊन अदानी, अंबानी यांच्या हितासाठी सार्वजनिक उद्योग खाजगी करून महागाई वाढविण्यात आली आहे. कॉ. अ‍ॅड. बन्सी सातपुते म्हणाले की, दरवर्षी दोन कोटी तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याऐवजी खाजगीकरणामुळे रोजगार गेले आहेत. जीएसटीमुळे शेतकरी व सर्वसामान्यांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे.

स्वामि नाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारून शेतकर्‍यांना हमी भाव देण्याचे आश्वासन पाळले नाही, त्यामुळे शेतकरी कायमच कर्जबाजारी झाला आहे. याकडे मोदी सरकारने दुर्लक्ष करून शेती धोयात आली आहे. त्याचप्रमाणे लढून मिळवलेले कामगार कायदे रद्द करुन उद्योगपतींना हवे तसे कायद्यांत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे कामगार असुरक्षित असून, नोकरी टिकविणे कठीण झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कॉ. अ‍ॅड. सुधिर टोकेकर म्हणाले की, कामगार कायदे बदलू पाहणारे भाजप सरकारला कामगार वर्गाने त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. नवीन कामगार कायदे लागू झाल्यास कामगार वर्गांना बर्‍याच समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. भांडवलदारांचे हित साधणारे कायदे असून, हे सरकारच भांडवलदाराचे आहे. हे सरकार उलथविण्याचे काम सर्वसामान्यांना करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य कामगार व शेतकरी वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणून त्यांना लोकसभेत पाठविण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष सक्रीय झाले असल्याचे जाहीर करण्यात आले. तर गाव पातळीवरील कार्यकर्त्यांना यावेळी सूचना करण्यात आल्या.