नगर शहरातील कचऱ्याबाबत निलेश लंकेंची थेट मोदींकडे तक्रार

0
137

ऑनलाईन तक्रारीत वाचला शहरातील अस्वच्छतेचा पाढा

नगर – लोकसभेचे महाआडीचे उमेदवार निलेश लंके यांनी नगर शहरातील उघड्यावरील कचरा व ठिकठिकाणच्या दुर्गंधीबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. केंद्र सरकारच्या अ‍ॅडमिनीस्ट्रेटिव्ह रिफॉर्मन्स एन्ड पब्लीक ग्रीएव्हेन्सेन्सच्या नोडल एजन्सीकडे लंके यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत निलेश लंके यांनी म्हटले आहे की, नगर शहरात नागरिकांशी संवाद साधत असताना त्यांची शहरातील रस्त्यांवरील व खुल्या जागेवरील कचर्‍याच्या ढिगार्‍यांबाबत, कचरा गाडी वेळेवर न येणे, अस्वच्छता व दुर्गंधी बाबत नागरिकांची तक्रार आहे. नागरिकांनी व नगरसेवकांनी वेळोवेळी नगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना व प्रशासनाला याबाबत तक्रार केली आहे. तरी त्यांच्याकडून याबाबत काही ठोस कारवाई झाली नाही. या समस्यामुळे शहरात अस्वच्छता, दुर्गंधी व नागरिकांचे आरोग्य धोयात आले आहे. याबाबत अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रशासनावर योग्य ती कारवाई करावी. लंके यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे शहरातील अस्वच्छतेबाबत थेट तक्रार केल्याने याची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

तक्रारीची केंद्राकडून दखल, चौकशीचे दिले आदेश

निलेश लंके यांनी नगर शहरातील अस्वच्छतेबाबत केंद्राकडे तक्रार केल्यानंतर त्याची तातडीने दखल घेण्यात आली. केंद्र सरकारने राज्य सरकारच्या उपसचिव रोशनी दिनेश कदम पाटील यांना याप्रश्नी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेशीत केले आहे.