एमआयडीसीतील कंपनीला कामगारानेच लावली आग

0
37

नगर – एमआयडीसीतील कंपनीत रात्रपाळीला असलेल्या कामगारानेच आग लावण्याची घटना सुपा एमआयडीसीत पळवे खुर्द गावच्या शिवारात असलेल्या व्यंकटेश पॉलीकोर प्रा.लि. या कंपनीत घडली आहे. या भीषण आगीत कंपनीतील शेड व साहित्य असे ८ कोटी ८५ लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत कंपनीचे प्लांट हेड हरिद्वार नंदलाल प्रसाद (रा. शिरूर, जि. पुणे) यांनी सुपा पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी फिर्याद दिली आहे. आगीची ही घटना २१ एप्रिल रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास घडली होती. आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने कंपनी व्यवस्थापनाने या घटनेची सखोल चौकशी केली.

भीषण आगीत कंपनीचे ८ कोटी ८५ लाख रुपयांचे नुकसान

त्यावेळी या आगीत कंपनीचे शेड व साहित्य असे ८ कोटी ८५ लाखांचे नुकसान झाल्याचे समोर आले. आग लागण्यामागील कारणाचा शोध घेतल्यावर त्या दिवशी रात्रपाळीला असलेला कामगार विशाल भाऊसाहेब गायकवाड (रा. जातेगाव, ता.पारनेर) याने कंपनीच्या पाठीमागील शेडमध्ये जावून माचीसमधील काडी ओढून प्लास्टिकचे फिनिश गुड पेटवून दिले. काही वेळातच आगीचा भडका होऊन ती सर्वत्र पसरली आणि कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले. त्यामुळे कंपनीचे प्लांट हेड हरिद्वार प्रसाद यांनी सुपा पोलिस ठाण्यात कामगार विशाल गायकवाड याच्या विरोधात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भा.दं.वि.कलम ३३६, ४२६, ४३५, ४३६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.