मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
16

बहिरे मूल मुकेही असते का?

बहिरेपणा म्हणजे कमीअधिक प्रमाणात ऐकू न येणे, हे तुम्हाला माहित असेलच. आपल्या कानाचे बाह्यकर्ण, मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण असे तीन भाग असतात. या तीन भागांपैकी एकात जरी दोष असला, तरी बहिरेपणा येऊ शकतो. याखेरीज मेंदूपासून निघणारी आठवी नस किंवा मेंदूचा ध्वनिज्ञानकेंद्राचा भाग यांपैकी कोठेही दोष असेल, तरीही ऐकू येत नाही. काही मुले जन्मताच मूकबधिर असतात. म्हणजे त्यांना ऐकूही येत नाही व बोलताही येत नाही. ही एक जन्मजात अशी बरी न होणारी व्याधी आहे. ऐकणे आणि बोलणे यांचा जवळचा संबंध आहे. आपण बोलायला कसे शिकतो, ते आता पाहू. लहान बाळाला आवाज आल्यास ते तिकडे वळून पाहायला लागते. येणारा आवाज आणि त्यासोबत होणार्‍या तोंडाच्या, ओठांच्या हालचाली यावर बालकाचे बारीक लक्ष असते! आपले अनुकरण करतच ते पहिल्यांदा “बाऽऽऽबा”, ताऽऽता” असे शब्द बोलते. ऐकू न आल्यास साहजिकच त्याला बोलता येत नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे ऐकू न आल्याने सभोवतालच्या परिस्थितीचे त्याला पुरेसे आकलनही होत नाही. त्यामुळे मुलाला भोवतालच्या गोष्टींबाबत रस वाटत नाही व त्याचा एकूणच विकास नीट होत नाही. यावरून बहिरे मूल बर्‍याचदा मुके असल्याचे तुम्हाला आढळेल किंबहुना बहिरे असल्यानेच ते मुकेही असते. लहान बाळाने आवाजाला प्रतिसाद दिला नाही, तर तात्काळ त्याच्या कानांची तपासणी करून घ्यावी. बहिरेपणाचे निदान झाल्यास बोलण्यासाठीचे विशेष प्रशिक्षण मुलाला द्यावे लागते. अर्थात असे शिक्षण देणार्‍या संस्था संख्येने फार कमी आहेत. मात्र असे शिक्षण दिल्यास मूकबधिर मुले काही प्रमाणात स्वावलंबी बनू शकतात