शिक्षणाधिकारी व जिल्हा कक्ष अधिकाऱ्यांचे निलंबन करा अन्यथा २४ एप्रिलला उपोषण

0
23

नगर – विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या प्राथमिकचे शिक्षणाधिकारी व जिल्हा सहाय्यक कक्ष अधिकारी यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) ओबीसी सेल वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी रिपाई ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, दानिश शेख, गुलाम शेख, अजय बडदे, रवी कानडे, आदिल शेख, विकास पटेकर आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिकचे शिक्षणाधिकारी व जिल्हा सहाय्यक कक्ष अधिकारी यांच्यावर १० एप्रिल रोजी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्हा गंभीर असून, वरील व्यक्तींना निलंबित केले गेले नाही. कोणत्याही शासकीय कर्मचार्‍यावर गुन्हा दाखल झाला असता जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत निलंबन करणे बंधनकारक असते. मात्र या प्रकरणातील अधिकार्‍यांचे निलंबन केले गेले नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. गुन्हा दाखल होवूनही सदरील व्यक्ती कोणाच्या आशीर्वादाने कामावर रुजू झाले? हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. या व्यक्तीचे तातडीने निलंबन करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा २४ एप्रिल रोजी जिल्हा परिषद समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.