शहरातील अनेक रस्त्यांवर भंगारातील वाहनाचा अडथळा

0
44

नगर- शहरातील अनेक सार्वजनिक रस्त्यावर नादुरुस्त वाहने उभी करण्याचे जणू हक्काचे ठिकाण बनत असून, त्यामुळे रहदारीलाही अडथळा निर्माण होऊ लागला आहे. माळीवाडा भागातील अहमदनगर महापालिकेच्या मोटार वाहन गॅरेजसमोर गेल्या अनेक वर्षापासून मुदतबाह्य, भंगार असलेली शववाहिनीचे वाहन धूळखात पडलेले आहे. यामुळे शहराच्या विद्रुपीकरणात वाढ होत असून, शहराचे सौंदर्य ही लोप पावत आहे. विशेष म्हणजे शहरातील अशी वाहने उचलण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाकडेसुध्दा आहे. शहराच्या सार्वजनिक रस्त्यावर बेवारस वाहनाचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे. शहरात पार्किंगच्या विषयाने प्रशासन त्रस्त झाले असतानाच अशातच अनेक रस्त्यांवर वर्षानुवर्षे बेवारस वाहने धूळखात पडलेली आहेत.

चारचाकी, रिक्षा, दुचाकी याव्यतिरिक्त इतरही वाहनांच्या सभोवताली कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. या अतिक्रमण आणि कचर्‍यामुळे पादचार्‍यांची गैरसोय होत आहे. सार्वजनिक आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. शहरातील गॅरेज, अपार्टमेंट, बिल्डिंग, मोकळ्या प्लॉटच्या आसपास व सार्वजनिक रस्त्याच्या बाजूला महिनो महिने धुळखात पडलेली व भंगार अवस्थेतील वाहने ताब्यात घेऊन जप्त करण्याची कारवाई करण्याची कारवाई मनपा, वाहतूक पोलीस, आरटीओ प्रशासनाने करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.