नगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; झाडे उन्मळली; घरांची पडझड; ४ जनावरे दगावली

0
64

नगर – विजांच्या कडकडाटासह झालेला अवकाळी पाऊस आणि वादळामुळे बुधवारी (दि.१७) दुपारनंतर नगर जिल्ह्यात अनेक भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वीज पडून जनावरांचा मृत्यू झाला तर काही नागरिक जखमी झाले आहेत. घरांचीही पडझड झाली असून, मोठमोठे वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडल्याने अनेक भागात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अनेक ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर पडल्याने महावितरणचे मोठे नुकसान होऊन वीजपुरवठा खंडित झाला होता. शेती माल आणि फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने सुरु केले आहेत. जिल्ह्यात गेल्या ३-४ दिवसांपासून विविध भागात पाऊस होत आहे. बुधवारी (दि. १७) दुपारनंतर मात्र पाऊस आणि सोबत वादळाने जिल्ह्याच्या अनेक भागात दाणादाण उडवली. या वादळाचा सर्वाधिक फटका पारनेर, नगर, जामखेड व पाथर्डी तालुयाला बसला आहे. जामखेड तालुयात वीज कोसळून २ गायी, १ बैल, १ वासरू मृत्यूमुखी पडले. पारनेर तालुयातील पिंपरी गवळी येथे वीज पडल्याने २ बैल मृत्युमुखी पडले आहेत, तर रुई छत्रपती शिवारात झाडाच्या आडोशाला बसलेल्या ३ मजुरांजवळ वीज पडून ते जखमी झाले आहेत. अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले, भिंती कोसळल्यामुळे अनेकांच्या संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

वृक्ष उन्मळून विजेच्या तारांवर, रस्त्यावर पडले

वादळामुळे अनेक ठिकाणी मोठ मोठे वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडल्याने अनेक भागात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. नगरजवळील केडगाव, सोनेवाडी, अकोळनेर रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्या होत्या. त्यामुळे काही काळ ठप्प झालेली वाहतूक रस्त्यावरील झाडे व झाडांच्या फांद्या बाजूला केल्यावर सुरळीत झाली. अनेक ठिकाणी विजांच्या तारांवर झाडे व झाडांच्या फांद्या पडल्याने तारा तुटून तर काही ठिकाणी विजेचे खांबही कोसळून वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचार्‍यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत काही ठिकाणी रात्री उशिरा तर काही ठिकाणी गुरुवारी सकाळी वीज पुरवठा सुरळीत केला. या वादळात महावितरणचे मोठे नुकसान झाले.

शेती माल आणि फळबागांचेही मोठे नुकसान

पावसाने शेतकर्‍यांच्या शेतीमालाचे आणि फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी उन्हाळी कांदा काढून शेतात ठेवला होता. तो भिजल्याने त्याचे नुकसान झाले. उन्हाळी इतर पिकांनाही वादळाचा फटका बसला. सध्या संत्रा, आंबा या फळांचा सीझन असून, वादळामुळे झाडाला लगडलेली फळे खाली पडून नुकसान झाले आहे. नगर तालुयातील खडकी, खंडाळा, बाबुर्डी, वाळकी परिसरात फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाने गुरुवारी सकाळपासून सुरु केले असून त्याचा अहवाल आल्यावरच नुकसानीचा खरा आकडा समोर येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.