दारुसह अवैध धंदे कायमस्वरुपी बंद करा अन्यथा ‘मतदानावर बहिष्कार’ घालणार

0
31

तक्रार केल्यानंतर पोलिस व जिल्हा प्रशासनाकडून केवळ जुजबी कारवाई; महिला, मुलींसह नागरिक त्रस्त

नगर – रहिवाशी परिसरात असलेल्या दारुगुत्त्यांसह अवैध धंद्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, शासनदरबारी वारंवार तक्रारी करूनही केवळ जुजबी कारवाई केली जात आहे. या दारु गुत्त्यांवर कठोर कायदेशिर कारवाई करावी अन्यथा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा गौरी घुमट परिसरातील नागरिकांनी दिला आहे. शहरातील गौरी घुमट परिसरात हॉटेलच्या नावाखाली अनेक अवैध दारुगुत्ते तसेच मटका, जुगार, सट्टेबाजी, धुम्रपान असे अवैध धंदे सुरु आहेत. मद्यपी या गुत्त्यांवर दारु पिवून आरडाओरड करणे, वाद घालणे, कोणाच्याही घरासमोर लघुशंका करणे, वांत्या करणे, परिसरातील महिला-मुलींना लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणे असे प्रकार सर्रासपणे सुरु असतात. त्यामुळे परिसरातील महिला-मुलींसह नागरिक त्रस्त झाले आहेत. एखाद्या मद्यपीला काही बोलल्यास त्यातून भांडणाचे प्रसंग ओढावतात. मद्यपी नागरिकांना शिवीगाळ करतात. त्यामुळे नागरिक हा त्रास मुकाट्याने सहन करत आहेत. या परिसरात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात दररोज अनेक महिला, मुली येतात. मात्र परिसरातील दारु गुत्त्यांवर दारु पिवून मद्यपी या उद्यानात बसबात. तेथे कानाकोपर्‍यात लघुशंका करतात, पिचकार्‍या मारतात.

मद्यपींच्या या त्रासाला कंटाळून महिला, मुलांचे येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. दारु गुत्त्यांवाल्यांना काही म्हटल्यास ते नागरिकांना दमबाजी करतात, धमया देतात. अवैध दारुगुत्ते कायमस्वरुपी बंद करण्यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी आतापर्यंत ८ ते १० वेळा पोलिस अधिकारी, जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी यांच्या भेटी घेवून निवेदने दिली आहेत, मात्र तक्रारीनंतर केवळ जुजबी कारवाई केली जाते. या कारवाईनंतर दारुगुत्ते दोन दिवस बंद ठेवली जातात आणि त्यानंतर ते पुन्हा बिनदिक्कतपणे सुरु होतात. हॉटेलबाबत तक्रार करू नये व शांत बसावे, यासाठी हॉटेलचालक नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीने दमबाजी करत असून, दहशत निर्माण करत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहेत. या दारु गुत्त्यांवर कठोर कायदेशिर कारवाई करून ते कायमस्वरुपी बंद करावेत अन्यथा मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा गौरी घुमट परिसर तसेच उद्यानात येणार्‍या परिवारातील नागरिकांनी दिला आहे. त्यासाठी हॅशटॅग जिल्हाधिकारी, हॅशटॅग पालिस अधीक्षक अशी मोहीम सोशल मिडियावर राबविली जात आहे.