शेतकऱ्यांना गुणवत्ता पूर्ण निविष्ठा वेळेत उपलब्ध होण्यासाठी काटेकोर नियोजन करा : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

0
35

नगर – खरीप हंगामामध्ये शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा पुरवठा होण्यासाठी कृषि विभागाने काटेकोर नियोजन करावे. तसेच जिल्ह्यात कोठेही कृषि निविष्ठाचा काळाबाजार अथवा लिकींग आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात खरीप हंगाम २०२४ च्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी शिर्डी येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, संभाजी लांगोरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सुधाकर बोराळे, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, कार्यकारी अभियंता, मुळापाटबंधारे विभाग सायली पाटील, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गणेश पुरी, प्रकल्प संचालक (आत्मा) गोकुळ वाघ आदींची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, खरीप हंगामात शेतकर्‍यांना गुणवत्तापुर्ण व दर्जेदार बि-बियाणे, खते मिळतील या साठी मुबलक प्रमाणात उपलब्धता ठेवा. बि-बियाणे, तसेच खतांची चढया भावाने विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जिल्हा व तालुका स्थरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात यावी. जिल्ह्यात सोयाबीन व कापूस पीकांची मुल्यसाखळी निर्माण करण्याचे निर्देश ही जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी उपस्थित अधिकार्‍यांना दिले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे यांनी कृषि विभागाच्या सादरीकरणादरम्यान खरीप हंगामातील पिकांचे क्षेत्र व उत्पादकता तसेच त्यासाठी आवश्यक असणार्‍या कृषि निविष्ठांच्या नियोजनाबाबत सविस्तर सादरीकरण केले. बैठकीस सर्व प्रांताधिकारी, सर्व उपविभागीय कृषि अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व गटविकास अधिकारी व सर्व तालुका कृषि अधिकारी ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित होते.