भरदिवसा मारहाण करत भाजी विक्रेत्याला लुटले

0
19

नगर – भाजी विक्री करून हातगाडी घेवून घराकडे चाललेल्या भाजी विक्रेत्याला रस्त्यात अडवून कुर्‍हाडीच्या दांड्याने मारहाण करत त्याच्या खिशातील रोख रक्कम बळजबरीने काढून घेतल्याची घटना शहरातील मल्हार चौक ते कायनेटिक रस्त्यावर मंगळवारी (दि.१६) दुपारी १२.४० च्या सुमारास घडली. याबाबत संतोष ज्ञानेश्वर काटपेलवार (वय ४९, रा. आव्हाड बिल्डींग, दौंड रोड) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा हातगाडीवर भाजी विक्रीचा व्यवसाय असून मंगळवारी दुपारी ते भाजी विक्री करून हातगाडी घेवून मल्हार चौक ते कायनेटिक चौक रस्त्याने घराकडे चालले होते. दुपारी १२.४० च्या सुमारास शुभम लोळगे (रा.दत्त डेअरी समोर, कायनेटिक चौक) याने त्यांच्या हातगाडीवरून काकडी घेतली. फिर्यादी यांनी त्यास पैसे मागितले असता त्याचा त्याला राग येवून त्याने शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर कुर्‍हाड घेवून येत त्या कुर्‍हाडीचे हातगाडीवर घाव घालत दहशत निर्माण केली. त्यानंतर त्याच कुर्‍हाडीच्या दांड्याने फिर्यादी यांना मारहाण करत त्यांच्या खिशातील १८०० रुपयांची रोकड व आधार कार्ड बळजबरीने हिसकावून घेतले व तेथून निघून गेला. या फिर्यादीवरून पोलिसांनी शुभम लोळगे याच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ३९४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.