नगर – नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील ग्रामदैवत हजरत निर्गुणशाहवली बाबांच्या वार्षिक यात्रोत्सवा निमित्त रविवारी (दि.१४) आयोजित करण्यात आलेल्या इनामी कुस्त्यांच्या आखाड्यात राज्यभरातील नामवंत मल्लांनी हजेरी लावत कुस्ती मल्ल विद्येतील आपले कसब दाखविले.यावेळी रंगलेल्या लक्षवेधी कुस्त्या पाहून उपस्थित कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटल्याचे दिसून आले. सारोळा कासारचा वार्षिक यात्रोत्सव आणि कुस्त्यांचा आखाडा संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.दरवर्षी चैत्र पंचमीला हा यात्रोत्सव साजरा केला जातो.त्यानंतर दुसऱ्या दिवशी इनामी कुस्त्यांचा आखाडा भरविला जातो.त्यासाठी गावकरी लोकवर्गणी जमा करतात. लोकवर्गणीद्वारे जमा केलेल्या पैशातून रविवारी (दि.१४) इनामी कुस्त्यांचा आखाडा रंगला, रोख बक्षिसांचा वर्षाव उपस्थित मल्लांवर करण्यात आला. गावच्या लोकवर्गणी सह उपस्थित मान्यवरांनीही रोख बक्षिसे देत मल्लांचा उत्साह वाढविला.कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणेसह नगर जिल्ह्यातील तसेच हरियाणा येथील अनेक मल्ल या ठिकाणी आले होते. राष्ट्रीय कुस्ती पटू व नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांच्यासह विविध गावांतील पदाधिकारी तसेच कुस्ती प्रेमी यावेळी उपस्थित होते.
राज्यभरातील नामवंत मल्लांची हजेरी; कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटले
यावेळी अनेक कुस्त्या अतिशय रंगतदार झाल्या, मल्लांचे डाव – प्रतिडाव,चपळाई,कुस्ती मल्लविद्येतील कसब पाहून टाळ्या व शिट्ट्यांचा आवाज घुमत होता. ५०० रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यंतच्या इनामाच्या कुस्त्या या आखाड्यात लावण्यात आल्या. मानाची १ लाख रुपये इनामाची कुस्ती उत्तर महाराष्ट्र केसरी सुदर्शन कोतकर व भारतीय सेनादलाचा मल्ल संग्राम पाटील यांच्यात झाली. सुदर्शन कोतकरने ती जिंकली. आखाड्याचे समालोचन बारामतीचे प्रशांत भागवत तर सूत्रसंचालन बाजार समितीचे सहसचिव संजय काळे व शिक्षक नेते संजय धामणे, शिवाजी कडूस, शहाजान तांबोळी यांनी केले. पंच म्हणून राजाराम धामणे, परसराम काळे, दत्तात्रय कडूस, उत्तम कडूस, बब्बू इनामदार, शंकर खोसे, नाना पारधे यांनी काम पाहिले. लोकवर्गणी व आखाड्याच्या नियोजनासाठी युवा महाराष्ट्र केसरी विष्णू खोसे, यात्रा कमेटीचे फकीरतात्या कडूस, मच्छिंद्र काळे, बबन तांबोळी, सुभाष धामणे, जयसिंग कडूस, विठ्ठल काळे, संतोष काळे, गजानन पुंड यांच्यासह ग्रामपंचायत व सोसायटीचे पदाधिकारी, सदस्य व गावातील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. या कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली होती.