काराभारात बदल न केल्यास महावितरणला टाळे ठोकणार

0
67

विजभारनियमनाने नगर शहरातील जनता त्रस्त; अधिक्षक अभियंत्यांना निवेदन

नगर- नेहमीची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे दरवर्षी पिढ्यान पिढ्या, वर्षानुवर्ष विद्युत महामंडळाचा अघोषित भारनियमानाचा प्रश्न नगरकरांना रोज भेडसावत असतो, त्याविषयी मोठ मोठे दावे केले जातात. परंतु नगरचे विद्युत महामंडळाने कार्यक्षमता दाखवून कारभारात बदल केला नाही तर या उन्हाळ्यात टाळे ठोकण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सहुास मुळे यांनी म्हटले आहे. या संदर्भात अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, उन्हाळा सुरू झालेला आहे उच्चभ्रू लोकांचा एसी, कुलर, डीप फ्रीज याचा वापर प्रचंड वाढला आहे. ही वाढती मागणी विद्युत महामंडळाच्या विद्वान अभियंत्यांना अगोदरच समजायलाच हवी, तरी देखील जम्पर वायर जळणे लोड वाढल्यामुळे ट्रिप होणे आणि तासा न् तास लाईट जाणे हे प्रकार रोज घडत आहेत, अघोषित भारनियमन सुरू झालेले आहे. त्याच्या बरोबरीने अजून एक नवीन समस्या सुरू झाली आहे ती म्हणजे लाईट गेल्यानंतर मोबाईल टॉवरचा वीज पुरवठा खंडित होतो मोबाईलच्या कंपन्या नुसत्या पैसे खाण्यात व्यस्त असल्यामुळे तेथील बॅटर्‍यांचे मेंटेनन्स केला जात नाही, तसेच तिथे जनरेटर देखील योग्य वेळी सुरू करण्याची व्यवस्था नाही, आणि जनरेटर लावल्यामुळे त्याचा आवाजाचा त्रास होतो, म्हणून ज्या ज्या इमारत धारकांनी टॉवर डोयावर बसून घेतले आहे आणि त्याचे भाडे खातात ते देखील जनरेटर लावायला विरोध करतात, त्यामुळे मोबाईल व्यवस्था कोलमडते, प्रत्येक शनिवारी नेटवर्कची बोंबाबोंब होते आहे. यावर जागतिक पातळीवर अत्यंत सहनशील असलेले नगरकर ब्र शब्दही काढत नाहीत. त्याच बरोबर पावसाळा दारात उभा आहे, आणि आमच्या अहमदनगर ला अहिल्यानगर… किंवा काहीही नावं ठेवलं तरी नावं ठेवायचे दुर्गुण काही या शहराचे संपत नाहीत, या शहराची ख्याती अशी आहे की आकाशात चार ढग भरून आले आणि चमचाभर जरी पाऊस पडला तरीपण काही सेकंदातच सगळी वीज गायब करण्यात येते, इतकी ऑटोमॅटिक सक्षम यंत्रणा संपूर्ण देशभरात कुठेच नसेल.

आजपर्यंत प्रत्येक शनिवारी ऐन कामाच्या वेळी म्हणजे सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत चार ते सहा तास शट डाऊन घेतला जातो, आणि कारण सांगितले जाते ते म्हणजे मेंटेनन्स… कित्येक ठिकाणी रस्त्यावर आणि कॉलनीमध्ये तारांना आडवी येणारी झाडं आणि तारांची एकंदर दयनीय अवस्था सुधारली जात नाही, झाड आहे की खांब आहे हे देखील समजत नाही असे विद्युत खांब त्यावरील लोंबकळत गेलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मरला वेढलेल्या वेली व वडाच्या पारंब्या देखील अनेक ठिकाणी दिसुन येत आहेत, यावरून प्रत्येक शनिवारी शट डाऊन घेऊन मेंटेनन्स केला जातो म्हणजे नेमके काय केले जाते? हा नगरकरांना पडलेला प्रश्न आहे, एक तर अहमदनगर जिल्हा दुष्काळी..म्हणून प्रसिद्ध आहे म्हणजे इथे अगदी कमी पाऊस पडतो त्यामध्ये देखील एक चमचाभर पाऊस पडल्यावर तासंतास वीज गायब होत असेल तर प्रत्येक आठवड्याला इतका काटेकोर मेंटेनन्स नेमका कशाचा केला जातो?आणि इतका रेग्युलर काटेकोर मेंटेनन्स केला जात असेल तर छटाक भर पावसाने तासान तास वीज कशी काय गायब होते? आणि विशेष म्हणजे हे फक्त आमच्याच शहरात होते महाराष्ट्रात इतर ठिकाणी ऐकिवात नाही… महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारी ठिकाण म्हणजे महाबळेश्वर अलिबाग पनवेल रायगड जिल्हा तिथे देखील २४ तास धुवांधार पाऊस कोसळत असताना विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत नाही, असा माझा तेथील वास्तव्यात स्वतःचा दीर्घ अनुभव आहे. तर मग अहमदनगर शहर असे कसे काय की जेथे ही विद्युत यंत्रणा चमचाभर पावसाने पाण्यात कोलमडून पडते? नगर शहराबाबत या विश्लेषणामध्ये ही कोणतीही अतिशयोक्ती नाही, पावसाळा जवळ जवळ आलेला आहे आता याच महिन्यात सगळ्या नगरकरांना हा अनुभव पिढ्यानपिढ्या वारसा हक्काप्रमाणे येतो आहे.

विद्युत महामंडळ न चुकता भाडेवाढ दरवाढ करून शॉक ट्रीटमेंट करत असते, मागच्याच महिन्यात विद्युत महामंडळाने वीज बिलामध्ये प्रचंड वाढ करून ठेवलेले आहे, त्यांनी त्यांच्या व वीज वितरण कार्यप्रणाली इन्फ्रास्ट्रचर मध्ये व कार्यक्षमतेमध्ये देखील अशी वाढ करून ही परिस्थिती बदलली तर नगरकरांवर उपकार होतील. थोड्याशा वादळामुळे लुळ्या पडलेल्या तारा एकमेकांवर घासून शॉर्ट सर्किट होणे कॉन्टॅटर जळणे, जम्प वायर तुटणे या अगदी प्राथमिक गोष्टी वारंवार घडतात, तर मग दर शनिवारी दिवसभर मेंटेनन्स नेमका कशाचा केला जातो? या गोष्टींचा आढावा अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांनी त्यांच्या वातानुकूलित केबिन मधून बाहेर पडून पावसाळ्यापूर्वी घ्यावा, अशी अपेक्षा आहे. अन्यथा त्यांच्या विभागाला टाळे लावून त्यांना भर रस्त्यात उन्हात उभे राहिल्यावर कसे वाटते याची अनुभूती या उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात जागरूक नागरिक मंचातर्फे दिली जाईल, त्याचबरोबर धुवाँधार पाऊस झाला तरीपण जर एक मिनिटभर देखील इतर शहरां प्रमाणे या शहराचे लाईट गेले नाहीत तर या विद्युत महामंडळाच्या अभियंत्यांचा मोठे रोख बक्षीस देऊन आम्ही या पावसाळ्यात जाहीर सत्कार करू. नगरकरांना पिढ्यांन पिढ्या रस्ते,लाईट, पाणी या कशाचाच सुख नशीबात नाही, सगळा भारत बदलला तरी नगर काही बदलत नाही,त्यामध्ये एखादी सुखाची झुळूक मिळावी, अशी विनंती जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांनी केली आहे.