इस्कॉन मंदिरात प्रथमच श्रीराम कथा महोत्सवाचा शुभारंभ

0
23

रामायणातील कथांचा मतितार्थ श्रवण करताना श्रोते मंत्रमुग्ध

नगर – येथील पाईपलाइन रोडवरील कादंबरी नगरीमधील इस्कॉन मंदिरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम कथा महोत्सवाचा शुभारंभ मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात उत्साहात करण्यात आला. मुंबईमधील गिरगांव चौपाटी येथे असलेल्या इस्कॉनच्या श्रीश्रीराधागोपीनाथ मंदिराचे प्रचारक श्रीमान गौरांगप्रिय प्रभुजी आणि नगरमधील इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक श्रीगिरीवरधारी प्रभूजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. श्रीगिरीवरधारी प्रभूजी यांनी परिचय करून देताना दिल्लीचे रहिवासी असलेले आणि एमबीबीएसची पदवी संपादन केल्यावर मुंबईतील भक्ती वेदांत हॉस्पीटलमध्ये वैद्यकीय सेवा करून २००१ पासून पूर्णवेळ इस्कॉनच्या कार्यास समर्पण केलेले श्रीमान गौरांगप्रिय प्रभुजी कथाकार म्हणून प्रथमच नगरला आले आहेत, असे सांगून पुष्पमाला घालून त्यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित सर्वांनी एका सुरात हरे कृष्ण मंत्राचे उच्चारण केल्याने वातावरणात उत्साह संचरला. व्यासपीठावर मदन मनोहरदास यांचेसह इस्कॉनचे गायक- वादक कलाकार उपस्थित होते. श्रीमान गौरांगप्रिय प्रभुजी पुढे म्हणाले, सनातन धर्मामध्ये श्रीरामनवमी हा महत्वपूर्ण उत्सव आहे. भगवान वेळोवेळी अवतार घेतात. भारतामध्ये भगवंताच्या अवतारांची स्मृती जागवत उत्सव साजरे करण्याची परंपराच निर्माण झाली आहे. रामायणाचा विचार करता मायावी बलशाली राक्षसांना जंगलात रहाणार्‍या वानरांनी केवळ काठी आणि दगडांच्या सहाय्याने सळो की पळो करत पराभूत करण्याची किमया करून दाखवली. सुग्रीवाने कुंभकर्णाचे कान तोडून आणण्याचे आणि शृंगार करण्यात मग्न असलेल्या रावणाच्या डोयावर लघुशंका करण्याचे धाडस दाखवले. ते केवळ श्रीरामांवरील भक्तीमुळेच !अनेक संकटांचा सामना करत वानरसेना लंकेवर चालून गेली ते सोबत श्रीराम असल्याने हे लक्षात घेतले पाहिजे. आज विश्वामधील सर्व समाजाला भगवान श्रीकृष्णांच्या आणि भगवान श्रीरामांच्या लिला श्रवण करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. श्रीकृष्ण आणि श्रीरामांच्या लिला पुन्हा-पुन्हा श्रवण केल्यास भौतिक समस्यांमधून लिलया बाहेर पडत असल्याचे अनूभवता येते. जो परिवार नियमितपणे ध्यानपूर्वक रामायण ग्रंथाचे वाचन करतो त्या परिवारातील सर्वांची मने सर्वप्रकारच्या कष्टांपासून कायम मुक्त रहातात. रामनाम के साबुन से जो मन का मैल छुडायेगा | निर्मल मन के दर्पण से वो राम के दर्शन पायेगा ॥ या गीताच्या संगीतबध्द ओळीवर भाविकांनी चांगलाच ताल धरला.

भगवंताला पहाण्यासाठी मन आणि बुध्दी स्वच्छ पाहिजे. जे समस्यांचा कठिण प्रसंगांचा सामना करतात त्यांचे मन अत्यंत कोमल रहाते. आपल्यापासून कोणालाही कसलाही त्रास होणार नाही, अशी काळजी घेत संवेदनशीलतेने कार्य करत रहावे. जय श्रीरामची घोषणा देणारांना रामायणाबद्दल काहीच माहिती नसते. या सृष्टीमधील सर्वो त्तम व्यक्ती प्रभू श्रीराम आहेत. मानसिक आणि अध्यात्मिकदृष्ट्या स्वस्थ असणार्‍या व्यक्ती देवाचे नाव घेऊ लागल्या की त्यांच्या डोळ्यांमधून पाणी टपकू लागते. यासाठी ह्रदय कोमल असावे लागते. परिवार-समाज-देश बदलण्यासाठी श्रीरामकथा पुन्हा-पुन्हा श्रवण करण्याची आवश्यकता आहे. हनुमानजींच्या लिलांमध्ये त्रृटी काढता येत नसल्यामुळेच त्यांची मंदिरे कोणत्याही देशात जा आहेतच! दुसर्‍यांना दुःख देणारे, हिंसा करणारे, मांसाहार करणारे भगवंताजवळ जावूच शकत नाहीत. भगवंताला मिळवू शकत नाहीत. आपण चूक केली असल्याने ती मान्य करून जो प्रायश्चित्त घेतो तो सज्जन असतो असे सांगताना त्यांनी महर्षि नारदमुनींच्या सल्ल्यावरून वाल्या कोळी वाल्मिकी ऋषी झाले, असे सांगितले. वाल्मिकी ऋषींच्याच आश्रमात सीतामाई सुरक्षित राहिल्या होत्या. तेथेच त्यांनी दोन पुत्रांना जन्म दिला. वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले रामायण सीतामाईंचे सुपुत्र लव आणि कुश यांनी अयोध्येत जावून प्रभू श्रीरामांपुढे गायिले, हा प्रसंग श्रीमान गौरांगप्रिय प्रभुजी तन्मयतेने सांगत असताना उपस्थित अनेक श्रोत्यांच्या डोळ्यांमधून अश्रूधारा वाहू लागल्या. पहिल्याच दिवशी श्रोत्यांचा मिळालेला मोठा प्रतिसाद पाहून श्रीराम कथा महोत्सवाचे आयोजन केलेल्या इस्कॉनच्या टिमचा उत्साह दुणावला.