सिंधी जनरल पंचायत आयोजित ‘चेटीचंड महोत्सव’ विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

0
55

नगर – सिंधी समाजाचे ईष्टदेव झुलेलाल देवजींच्या जयंती, सिंधीभाषा दिवस तसेच सिंधी नववर्षाच्या निमित्ताने येथील सिंधी जनरल पंचायतच्या वतीने आयोजित चेटीचंड महोत्सव २०२४ सावेडी रोडवरील संजोग लॉन्स येथे नुकताच उत्साहात पार पडला. यात नगर शहर व परिसरातील तसेच जिल्ह्यातील हजारो सिंधी बांधव सहकुटूंब सहभागी झाले होते. त्यामुळे परिसर गजबजून गेला होता. प्रारंभी संजोग येथे उभारलेल्या आकर्षक मंडपात झुलेलाल देवजींच्या बहराणो साहिबची पूजा, आरती व पल्लवचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते व भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर विविध खाद्य-पेय स्टॉल्सचे उद्घाटन डॉ.भगवान कालानी व सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष महेश मध्यान यांच्या हस्ते फित कापून सुरुवात करण्यात आली. मेळाव्याच्या मुख्य कार्यक्रमात उपस्थितांच्या मनोरंजनासाठी उल्हासनगर येथील मुकेशकुमार म्युझिकल पार्टीच्या कलाकारांनी संगीतमय, मनोरंजक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची वाह ऽ वाह मिळविली. कार्यक्रम स्थळी उपस्थितांसाठी विविध खाद्य-पेयांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. ज्याचा मनमुराद आनंद सर्वांनी घेतला. एकमेकांच्या गाठी-भेटी घेत, सिंधी नववर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा देत, गप्पांच्या मैफलीत सगळे तल्लीन झाले होते. बहुरुपी वीर हनुमान मुलांसाठी विशेष आकर्षण होते.

याप्रसंगी उपस्थितांसाठी तंबोला गेमचे आयोजन केले गेले, त्यातील विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमस्थळी राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहात सिंधी बांधवांना चेटीचंड, झुलेलाल देवजी जयंती व सिंधी भाषा दिवसनिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमस्थळी सिंधी चॅनल (२४*७) दूरदर्शनवर सुरु होण्यासाठी सह्यांची मोहिम राबविण्यात आली. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला देशभरातील सिंधी बांधवांच्यावतीने असाच उपक्रम राबवत प्रधानमंत्री व सूचना प्रसारण मंत्र्यांना समस्त सिंधी समाजाच्यावतीने डीडी सिंधी चॅनल सुरु करण्याची मागणी करण्यात येणार आहे. शेवटी मेळाव्यात उपस्थितांसाठी सोडत काढण्यात आली. यातील २३ विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. प्रारंभी सकाळी तारकपुर येथील झुलेलाल मंदिर येथे पुज्य बहिराणो साहबची पूजा, आरती, पल्लवचा कार्यक्रम पाहुण्यांच्या उपस्थितीत झाला. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिंधी जनरल पंचायतचे समस्त सदस्य तसेच इतर अनेक संस्थांच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. पंचायतचे अध्यक्ष महेश मध्यान यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सुरेश हिरानंदानी, मनिष आहुजा यांनी केले.