अर्बन बँक कर्ज फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या १० जणांविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल

0
63

पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांची माहिती

नगर – नगर अर्बन बँकेतील कर्ज फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या संचालक, अधिकारी व कर्जदार अशा दहा जणांनी विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती तपासी अधिकारी तथा उपअधीक्षक अमोल भारती यांनी दिली. सुमारे ८ हजार पानांच्या या दोषारोप पत्रात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे, व्यवहारांची माहिती व फॉरेन्सिक अहवालाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात कर्ज फसवणूक प्रकरणाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेमर्फत सुरू आहे. पोलिस प्रशासनाने या संपूर्ण घोटाळ्याचे फॉरेन्सिक ऑडिट करून घेतले आहे. यात प्रथमदर्शनी सुमारे १०५ जणांवर ठपका ठेवण्यात आलेला आहे. तर सुमारे २९१ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. आरोपींपैकी १० जणांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक करून त्यांच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल केले आहे. त्यात संचालक मनेष दशरथ साठे, अनिल चंदुलाल कोठारी, अशोक माधवलाल कटारिया, सीए शंकर घनश्यामदास अंदानी, बँकेचा अधिकारी प्रदीप जगन्नाथ पाटील, राजेंद्र शांतीलाल लुणिया, मनोज वसंतलाल फिरोदिया, कर्जदार प्रवीण सुरेश लहारे, अविनाश प्रभाकर वैकर, अमित वल्लभभाई पंडित यांचा समावेश आहे.