मतदान करून देशाच्या लोकशाहीला बळकट करावे

0
27

नगर – मतदान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. भारतीय संविधानाने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदार जागृती अभियानात मेहेर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येक मतदाराने मतदान करून देशाच्या लोकशाहीला बळकट करावे, असे प्रतिपादन मेहेर इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी यांनी केले आहे. हिंद सेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलच्या वतीने नगर शहरात प्रभात फेरी काढून मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. प्रभात फेरी पटवर्धन चौक, लक्ष्मी कारंजा, कापड बाजार, भिंगारवाला चौक, शहाजी राजे भोसले मार्ग, नवीपेठ, नेता सुभाष चौक, चितळे रोड, चौपाटी कारंजा येथून समारोप मेहेर इंग्लिश स्कूल येथे समारोप करण्यात आला. या कार्यक्रमासाठी हिंद सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकार्‍यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी मेहेर इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम, पोलिस उपनिरीक्षक अण्णासाहेब परदेशी, सहाय्यक फौजदार मन्सूर सय्यद, पो.हेड कॉन्स्टेबल आप्पासाहेब बोडखे, पो.कॉ.अतुल लगड, पोलीस कॉन्स्टेबल शरद वर्पे, भाई सथ्था नाईट स्कूलचे प्राचार्य सुनिल सुसरे, मेहेर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रा.अनुरीता झगडे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम म्हणाले, आचार संहितांचे नियमाचे नागरीकांनी काटेकोर पणे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे. अनुरीता झगडे म्हणाल्या की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. शंभर टक्के मतदान करावे व मतदानाचा हक्क बजवावा. विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना मतदान करण्यासाठी आग्रह करण्याचे स्पष्ट करुन त्यांना मतदानाचे महत्त्व विशद करण्यात आले. या मतदार जागृती अभियानात मेहेर इंग्लिश स्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.