हद्दपार केलेल्या गुन्हेगारांचे शहर परिसरातच वास्तव्य

0
34

एकाच दिवसात चार जणांच्या ’एलसीबी’ पथकाने आवळल्या मुसया नगर – नगर जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या गुन्हेगारांचे नगर शहर परिसरातच खुले आम वास्तव्य असल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला ही माहिती मिळताच त्यांनी धडक मोहीम राबवून शुक्रवारी (दि.५) दिवसभरात ४ हद्दपार गुन्हेगारांना पकडले आहे. त्यांच्यावर एमआयडीसी, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. रोहित वसंत फंड (वय २९, रा. साळुंके वाडा, वंजार गल्ली, अहमदनगर), प्रवीण विजय मिरपगार (वय २३, रा. नागापूर), मडया उर्फ शुभम उर्फ शिवम मारुती धुमाळ (वय २३, रा. त्रिमूर्ती चौक, सारसनगर), नितीन किसन लाड (वय २५, रा. भगवानबाबा नगर, सारसनगर) अशी या आरोपींची नावे आहेत. यातील रोहित फंड याला १२ जानेवारीला ६ महिन्यांसाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तो घरी मिळून आल्याने त्याला पकडून तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. प्रवीण मिरपगार याला २२ मार्च रोजी ६ महिन्यांकरिता नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तो घरी मिळून आल्याने त्याला पकडून एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मडया उर्फ शुभम धुमाळ याला २२ सप्टेबर २०२२ रोजी २ वर्षांकरिता नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तो घरी मिळून आल्याने त्याला पकडून भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नितीन लाड याला १९ मे २०२२ रोजी २ वर्षांकरिता नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. तो घरी मिळून आल्याने त्याला पकडून भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी दिवसभरात ही कारवाई केली आहे.