बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत शिपायाला केली लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

0
26

नगर – बँकेच्या कामकाजाची वेळ संपल्याने शिपायाने दरवाजा बंद केला. तरीही बळजबरीने बँकेत घुसत मला आत्ताच पैसे पाहिजेत असे म्हणत बँकेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत शिपायाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना नगर शहरातील चौपाटी कारंजा येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत शुक्रवारी (दि.५) दुपारी ४ च्या सुमारास घडली. याबाबत श्रीनिवास रविंद्र अरकल (रा. नित्यसेवा सोसायटी, पाईपलाईन रोड) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे बँक ऑफ महाराष्ट्रच्या चौपाटी कारंजा शाखेत कंत्राटी पद्धतीने शिपाई म्हणुन नोकरीस असुन शुक्रवारी (दि.५) दुपारी ४ वाजता बँकेचा खातेधारकासाठी असलेला वेळ संपल्याने त्यांनी बँकेचा दरवाजा बंद केला. त्यानंतर काही वेळातच बँकेचा खातेदार असलेला नावेद सलमान शेख (रा. फलटण पोलिस चौकी जवळ, कोठला) हा तेथे दरवाजा उघडुन आत आला. त्यावेळी अरकल त्यास म्हणाले की खातेधारकासाठी बँकेची वेळ संपलेली आहे, तुम्ही उद्या पुन्हा या. असे म्हणाल्याचा राग आल्याने त्याने मुझे अभी अभी पैसे चाहीए, मुझे कुछ पता नही असे म्हणुन अरकल यांना लाथाबुयाने मारहाण करुन शिविगाळ करु लागला. त्यावेळी बँकेतील इतर कर्मचारी यांना देखील नावेद शेख यांने मुझे अभी पैसे चाहीए असे म्हणुन त्यांना देखील शिविगाळ केली. हा सर्व गोंधळ पाहून शाखेचे मँनेजर अभीजीत फळे हे मध्ये सोडविण्यास आले असता त्यांनाही शिविगाळ करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी नावेद शेख याच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम १८६, ३२३, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.