रसिक ग्रुपच्यावतीने विविध पुरस्कारांची घोषणा; गायक अवधूत गुप्ते यांना ‘कलागौरव पुरस्कार’

0
35

नगर – विविध क्षेत्रात सामजिक जाणीवेतून महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या व्यक्तीमत्वांना तसेच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या व्यक्तींना व नगर शहराच्या जडण घडणीत, विकासात व नावलौकिकात मोलाची भर घालणार्‍या व्यक्तींना रसिक ग्रुपच्या वतीने दरवर्षी ‘रसिक गौरव पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात येते. यावर्षी गायक अवधूत गुप्ते यांनी सामाजिक जाणीवेतून संगीत क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांना स्व.शांतीकुमार फिरोदिया स्मृती रसिक कलागौरव पुरस्कार देवून विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तसेच स्व.प्रदीप गांधी स्मृती तरुणाई पुरस्काराने युवा बॅडमिंटनपटू यश शहा याला सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रसिक गौरव पुरस्कराने डॉ.सुधा कांकरिया, नवोदित गायिका अपूर्वा निषाद, ग्राफिक डिझायनर किरण गवते, वादक अजय साळवे, वादक अजित गुंदेचा, माजी रणजीपटू अझीम काझी, क्रीडा संघटक विजयसिंह मिस्कीन व उद्योजक दिनेशकुमार अग्रवाल आदींना सन्मानित करण्यात येणार आहे. ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त सावेडीच्या जॉगिंग पार्क मैदानावर सायंकाळी ६ वाजता होणार्‍या ‘रसिकोत्सव’ या संगीत सांकृतिक कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी दिली.

गुढीपाडवा रसिकोत्सव या राज्यातील सर्वात मोठ्या संगीत सांकृतिक सोहळ्याचे यंदाचे २२ वे वर्ष आहे. यानिमित्त नगर शहराच्या जडणघडणीत, विकासात व नावलौकिकात मोलाची भर घालत विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या व्यक्तीमत्वांना तसेच सामाजिक व सांकृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या व्यक्तींना ग्रुपच्या वतीने पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येत आहे. गेल्या २१ वर्षांपासून ही परंपरा जपली जात आहे, अशी माहिती सुदर्शन कुलकर्णी यांनी दिली. यावर्षी प्रदान करण्यात येणार्‍या पुरस्कारांची सविस्तर माहिती देताना दिपाली देऊतकर यांनी सांगितले की, गायक अवधूत गुप्ते यांनी अनेक सर्वसामान्य कुटुंबातील व ग्रामीण भागातील कलाकारांम धील कला हेरून त्यांना प्रोत्साहन देत गायनाचे प्रशिक्षण देवून यशस्वी गायक बनवले आहेत. त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल अवधूत गुप्ते यांना कलागौरव पुरस्कार देवून विशेष सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच नगरचा युवा बॅडमिंटनपटू यश शहा याने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक बॅडमिंटन स्पर्धांमध्ये यशस्वी होत नगरचे नावलौकिक वाढवले आहे. याबद्दल तरुणाई पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात येणार आहे. नगरच्या डॉ. सुधा कांकरिया यांच्या सामाजिक कार्याबद्दल व जगातील सर्वात मोठ्या नोबेल पीस अ‍ॅवॉर्डसाठी नामांकन झाल्याबद्दल त्यांना पुरस्कराने सन्मानित करण्यात येणार आहे.

नगरची नवोदित युवा गायिका अपूर्वा निषाद हिने अल्पकाळातच पूर्ण राज्यात मोठी प्रसिद्धी मिळवत यशस्वी गायिका झाल्याबद्दल पुरस्कराने सन्मानित करण्यात येणार आहे. सर्वसामान्य कुटुंबातून वर येत प्रतिकूल परीस्थीतीवर मात करत स्वकष्टाने यशस्वी ग्राफिक डिझायनर झालेले किरण गवते यांना पुरस्कराने सन्मानित करण्यात येणार आहे. अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमात उत्कृष्ट संगीतसाथ देत रंगत आणणारे वादक अजय साळवे यांना व उत्कृष्ट वादक अजित गुंदेचा या दोघांना संगीत क्षेत्रातील बहुमोल योगदाना बद्दल पुरस्कराने सन्मानित करण्यात येणार आहे. आयपीएलच्या धर्तीवर नागपूर येथे झालेल्या एमपीएलच्या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या टीमचा कर्णधार व माजी रणजीपटू अझीम काझी यांना पुरस्कराने सन्मानित करण्यात येणार आहे. कबड्डी खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धांचे उत्कृष्ट नियोजन करणारे क्रीडा संघटक विजयसिंह मिस्कीन पुरस्कराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारचा राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार मिळवलेले नगरचे यशस्वी उद्योजक श्रीजी इंडस्ट्रीजचे संचालक दिनेशकुमार अग्रवाल व टेनॉट्रॅक कंपनीस पुरस्कराने सन्मानित करण्यात येणार आहे. ग्रुपचे सदस्य तेजा पाठक, निखिल डफळ, समीर पाठक, प्रशांत अंतापेलू, मीनाक्षी पाटील, ऋषिकेश येलुलकर, प्रसन्ना एखे, शारदा होशिंग व श्रीकृष्ण बारटक्के आदी कार्यक्रमाचे नियोजन करीत आहेत.