अजित पवारांना फसवणारे उद्या जनतेलाही फसवतील

0
45

नगर – पाच वर्षात आम्ही केलेल्या विकास कामांच्या अजेंड्यावर ही लोकसभा निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे आमच्या पुढे समोरच्या उमेदवाराची कामे काहीच नाही. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना साथ देण्याचे नाटक करून त्यांच्या कडून करोडो रुपयांचा निधी मिळवत त्यांना फसवत त्यांची साथ सोडली. उद्या ते जनतेलाही फसवत साथ सोडतील, यात शंका नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी केलेले एक तरी मोठे काम दाखवावे मगच एमआयडीसी आणण्याच्या गप्पा माराव्यात, अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी उमेदवार निलेश लंके यांचे नाव न घेता केली. महायुतीचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)च्या वतीने जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन नगरमध्ये गुरवारी करण्यात आले होते. या मेळाव्यात अध्यक्षस्थानाहून मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवा अध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे नूतन राज्य अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, प्रदेश सचिव राजेंद्र गुंड, माजी आमदार चंद्रशेखर घुले, निवडणूक समन्वयक आ.संग्राम जगताप, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, युवा जिल्हाध्यक्ष नंदकुमार मुंडे आदी उपस्थित होते. मंत्री श्री. विखे पुढे म्हणाले, राज्यात अडीच वर्ष शरद पवारांचे रिमोट कंट्रोल असलेले महाविकास आघाडीचेच सरकार होते. त्यावेळी जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प किंवा एखादी एमआयडीसी का नाही करून दाखवली? असा प्रश्न मी शरद पवारांना करत आहे. याउलट जे जाणता राजास जमले नाही ते मी पालकमंत्री व महसूलमंत्री झाल्यावर या जिल्ह्यासाठी केले आहे, जिल्ह्यातील तीन एमआयडीसींसाठी १७०० एकर जागा विनामूल्य देण्याचा महत्वाचे काम मी केले आहे. उद्योजक, कारखानदारांना मोकळा श्वास घेता यावा, यासाठी सुपा एमआयडीसीमधील त्यांची गुंडगिरी संपवायची आहे. यासाठी महायुतीचे उमेदवार सुजय विखेंना ऐतिहासिक मताधियाने निवडून आणणे आवश्यक आहे.

यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री विखेंनी केले. उमेदवार सुजय विखे म्हणाले, मागच्या निवडणुकीत मी व आ.संग्राम जगताप एकमेकांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढलो. आज स्टेजवर उपस्थित असलेले सर्व नेते मंडळीनी जगतापांचा प्रचार केला होता. आज मात्र सर्व जण माझ्याबरोबर असल्याचा आनंद होत आहे. गेल्या ५० वर्षांपासून राजकारणात असलेल्या विखे कुटुंबाने आजपर्यंत एकही व्यक्तीला त्रास न देता रस्त्यावर आणले नाही. जिल्ह्याच्या राजकारणात वैचारिकता जपत सुसंस्कृतपणा आणला. या निवडणुकीत कोण काय बोलतोय, कोण काय करताय याकडे लक्ष देवू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विकास कामांकडे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामांकडे पाहून नरेंद्र मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधान होण्यासाठी प्रत्येकाने ताकद लावावी. राष्ट्रवादी काँग्रेसची ही ताकद माझ्या मागे पूर्णपणे उभी राहिल्यास समोरच्या उमेदवाराचे डीपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ही निवडणूक गरिबी श्रीमंतीची नसून पुढच्या पिढीच्या भविष्याची आहे. त्यामुळे सर्वांच्या उज्वल भवितव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा. आ.संग्राम जगताप म्हणाले, देशात पुन्हा नरेंद्र मोदिंचेच वारं आहे. त्यामुळे देशाच्या व जिल्ह्याच्या विकासासाठी प्रवाहाच्या दिशेने जाणेच योग्य आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजप बरोबर जाण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. सुजय विखेंनी प्रत्येक तालुयाचे प्रश्न समजून घेत ते लोकसभेत मांडून सोडवले आहेत.

भिंगारचा व के के रेंजचा प्रश्न सोडवण्यासाठी खा.विखेंनी संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची तेथे भेट माझी घडवून आणल्याने ते प्रश्न सुटले. ते तुमचे हक्काचे व्यक्ती असल्याने त्यांना पुन्हा खासदार करण्यासाठी सर्वांनी काम करावे. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा म्हणाले, देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी सर्व महायुतीचे उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. सुजय विखे व विखे परिवाराचे जिल्ह्याचा विकासात सर्वात मोठे योगदान आहे. खासदार या नात्याने त्यांनी गेल्या २० – २५ वर्षाच्या इतिहासात सर्वात जास्त विकास निधी आणला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा खासदार करण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी कंबर कसली आहे. राधाकृष्ण विखे यांनी श्रीगोंदा तालुयाच्या पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष देवून तो तातडीने सोडवावा, अशी मागणी नाहाटा यांनी केली. यावेळी चंद्रशेखर घुले, अनुराधा नागवडे, राजेंद्र नागवडे, सुरज चव्हाण, सुनील उमाप, विक्रमसिंह कळमकर आदींनी मनोगत व्यक्त केले. दत्तात्रय पानसरे यांनी आभार मानले.