साेन्याचे दागिने साफ करण्याच्या बहाण्याने वृद्धेचे 1 ताेळ्याचे कर्णुले 2 महिलांनी पळविले

0
26

नगर – कानातील सोन्याच्या फुलांना मळ झाला आहे, ते आम्ही साफ करून देतो, अशी बतावणी करून वृध्द महिलेच्या कानातील एक तोळ्याचे सोन्याचे फुले दोन महिलांनी लुबाडले. रेल्वे स्टेशनजवळील पुलाजवळ ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नासीरा खलील शेख (वय ६५, रा. बेलदार गल्ली, सर्जेपुरा) यांनी फिर्याद दिली आहे. त्या मंगळवारी (दि. २) सकाळी साडे अकराच्या सुमारास मंगळवार बाजारात गेल्या होत्या. तेथे त्यांना दोन अनोळखी महिला भेटल्या. त्या म्हणाल्या,‘दवाखान्यासाठी आम्हाला पैशाची गरज आहे, त्याकरिता आमच्या जवळील सोन्याचे मनी सोनाराकडे मोड करून पैसे पाहिजे आहे, तेव्हा तुम्ही मला तुमच्या ओळखीच्या सोनाराकडे घेऊन चला व आम्हाला सोनाराकडून पैसे घेऊन द्या’, माणुसकीच्या नात्याने फिर्यादी त्यांच्यासोबत रिक्षातून गेल्या असता त्यांनी रिक्षा रेल्वे स्टेशन जवळील पुलाजवळ नेली. त्यांनी ‘आम्हाला सोने मोडायचे नाही’ असे सांगून ‘तुमच्या कानातील सोन्याच्या फुलांना खूप मळ झाला आहे. आम्ही साफ करून देतो’, अशी बतावणी केली. फिर्यादीने कानातील फुले काढून दिले असता त्यांनी परत फुले मागे देत ते सोनाराकडून साफ करून घेण्याचा सल्ला दिला. दरम्यान फिर्यादीने ते फुले कापडी पिशवीत ठेवले. त्या काही वेळाने घरी गेल्या असता त्यांना पिशवीत सोन्याची फुले दिसून आली नाही. त्या दोन महिलांनी ते चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.