शेअर बाजारात तेजीचा ‘उच्चांक’

0
70

मुंबई – शेअर बाजारासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. गुरुवारी (दि.४) बाजारात व्यवहार सुरू होताच सेन्सेस आणि निफ्टी निर्देशांकाने नव्या ऑल-टाइम उच्चांकावर मुसंडी मारली. बाजार उघडताच सेन्सेस ७४,५०१ अंक आणि निफ्टी २२,६१९ अंकांवर पोहोचला. तर सध्या मार्केट सर्वकालिक उच्चांकी पातळीपेक्षा किंचित घसरून व्यवहार करत आहे. मार्केटच्या सुरुवातीच्या सत्रात एचडीएफसी बँकेच्या शेअरनेही दमदार तेजी नोंदवली असून आज २.५५% उसळीसह १,५२०.१५ रुपयांवर पोहोचले तर हिंदाल्कोमध्ये १.८९%, एनटीपीसीमध्ये १.७५%, पॉवर ग्रीडमध्ये १.३९% आणि सिस बँक स्टॉकमध्ये १.३८ टक्के तेजी नोंदवली गेली. तसेच इंडसइंड बँक आणि सन फार्मा दोनच शेअर्स निफ्टीच्या टॉप लूजर्समध्ये आहेत.

शेअर बाजाराला पॉझिटिव्ह संकेत

गेल्या दोन दिवसांपासून घसरत असलेल्या बाजारासाठी जागतिक संकेत चांगल्या सुरुवातीकडे निर्देश करत होते. आशियाई बाजारांत आज तेजीसहा व्यवहार झाले, तर यूएस फेड रिझर्व्हचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांच्या विधानानंतर बुधवारी अमेरिकी शेअर बाजाराचे निर्देशांकही सकारात्मक होते. पॉवेल म्हणाले की फेडरल रिझर्व्हचे अधिकारी या वर्षाच्या शेवटी प्रमुख व्याजदर कमी करू शकतात.

कोणते शेअर्स फायद्यात

बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये मजबूत तेजी दिसत असून बाजाराला आणखी मोठ्या तेजीकडे नेण्यात आधार देत आहेत. बाजार उघडताच बँक निफ्टीने ४८,२५४.६५ अंकांचा उच्चांक गाठला आणि ४८,६३६.४५ अंकांच्या सर्वकालीन उच्चांकाच्या अगदी जवळ आला आहे. दरम्यान, बीएसईवरील मार्केट कॅप ३९९.९९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे आणि ४०० लाख कोटी रुपयांच्या एम-कॅपच्या मार्गावर आहे. शेअर बाजारासाठी ही ऐतिहासिक कामगिरी असून भारतीय शेअर बाजार मोठ्या मजबूत स्थितीत पोहोचला आहे.

आशियाई बाजारांमध्येही वाढ

अमेरिकी बाजारांच्या तेजीनंतर आशियाई बाजारांमध्ये वाढ झाली. जपानचा निक्केई १.३४% वाढून ४० हजारांवर पोहोचला, तर टॉपिस १.०५ टक्क्यांनी वधारला. दक्षिण कोरियाचा कोस्पी १.२२ टक्क्यांवर तर हाँगकाँग, चीन आणि तैवानमधील बाजारपेठा सार्वजनिक सुट्टीनिमित्त बंद आहेत. दुसरीकडे गिफ्ट निफ्टी २२,५९४ पातळीच्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदच्या तुलनेत सुमारे ५२ अंकांनी अधिक आहेत जे सेन्सेस-निफ्टीची सकारात्मक सुरुवात दर्शवते.