मंजूर कर्जाची दोन कोटीची रक्कम परस्पर सावकाराच्या खात्यात वर्ग

0
33

पतसंस्थेच्या चेअरमन, व्यवस्थापकासह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

नगर – सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी पतसंस्थेत कर्ज प्रकरणे दाखल केलेल्या १२ कर्जदारांची मंजूर झालेली सुमारे २ कोटी रुपयांची रक्कम परस्पर दुसर्‍या सावकाराच्या खात्यात वर्ग करून अवैध सावकारकी करत फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पतसंस्थेचे चेअरमन, व्यवस्थापक यांच्यासह ४ जणांवर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सदरचा प्रकार पारनेर तालुयातील राजे शिवाजी बिगर शेती सहकारी पतसंस्था कान्हूरपठार या संस्थेच्या पारनेर शाखेत मे २०२३ ते १ डिसेंबर २०२३ या कालावधीत घडला आहे. या प्रकाराची तक्रार कर्जदारांनी पारनेरच्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात केल्यावर त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यात तथ्य आढळून आल्यावर सहकार अधिकारी (श्रेणी -१) तात्यासाहेब शहाजी भोसले यांनी बुधवारी (दि.३) दुपारी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार शिवाजी चंदर रिकामे याच्यासह अन्य ११ जणांनी शिरूर येथील एका सावकाराकडून ४ टक्के व्याज दराने सुमारे २ कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले होते. ते फेडण्यासाठी त्या सर्वांनी राजे शिवाजी बिगर शेती सहकारी पतसंस्था कान्हूरपठार या संस्थेच्या पारनेर शाखेत कर्ज प्रस्ताव सादर केले. त्यासाठीच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यावर सर्वांचे कर्ज प्रस्ताव मंजूर झाले.

मात्र त्याची रक्कम कर्जदारांना न देता पतसंस्थेचे चेअरमन आझाद ठुबे व मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी भालेकर यांनी कर्जाची २ कोटी रुपयांची रक्कम हंगा (ता.पारनेर) येथील सागर असोसिएट चे प्रो. प्रा. पोपट बोल्हाजी ढवळे यांच्या खात्यावर वर्ग करत या कर्जदारांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी पतसंस्थेचे चेअरमन आझाद ठुबे, मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी भालेकर, पोपट बोल्हाजी ढवळे व शिरूर येथील रणजीत गणेश पाचारणे या चौघांविरुद्ध भा.दं. वि. कलम ४०९, ४२०, ४६८, ४७१,४७७ (अ), ३४ सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कमल ३९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.