उपाययोजना करूनही बाजारपेठेत वाहतूक नियमांचे सर्रास ‘उल्लंघन’

0
33
NR

अपघातांच्या घटनांमध्ये होतेयं वाढ; दुचाकीवर एक-दोन नव्हे तर चक्क पाच जण सवार, वाहतूक पोलिस बघ्याच्या भूमिकेत

नगर – शहर परिसर आणि विशेषतः बाजारपेठेत वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना करूनही वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. एका दुचाकीवर एक-दोन नव्हे तर चक्क पाच-पाच जण बसून पोलिसांच्या नाकासमोरून सुसाट वेगाने निघून जातात. नियमांकडे दुर्लक्ष करत असलेल्या अशा दुचाकीस्वारांमुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडत असून, त्यात दुखापतीसह काही वेळा जीव गमविण्याची वेळ येते. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या दुचाकी, चारचाकी वाहनचालकांवर तात्काळ कारवाई करून अपघातासारख्या गंभीर घटना रोखाव्यात, अशी मागणी होत आहे. सध्या रमजान सणाची धामधूम सुरू आहे. तसेच परीक्षांचा काळ सुरू आहे. त्यामुळे शहरात आणि बाजारपेठेत सकाळ-संध्याकाळच्या वेळेस गर्दी वाढत आहे. वाहतूक नियंत्रणासाठी ठिकठिकाणी रस्त्यावर चौका-चौकात बॅरीकेटस् लावण्यात येऊन वाहतूक पोलिसही तैनात करण्यात आलेले आहेत. मात्र या वाहतूक नियंत्रणांच्या उपाययोजना आणि तैनात पोलिसांकडे दुर्लक्ष करत सर्रासपणे वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत आहेत.

परीक्षेसाठी अथवा शाळेत जाणारे अल्पवयीन विद्यार्थी दुचाकीवर तीन, चार आणि कधी-कधी पाच जण बसून रस्त्यावरून जाताना दिसतात. विद्यार्थी असल्याकारणाने पोलिसही त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. परंतु याच विद्यार्थी दशेत त्यांना वाहतूक नियमांचे गांभीर्य समजले तर भविष्यात ते सुजाण नागरिक घडू शकतात. त्यासाठी अशा अल्पवयीन विद्यार्थ्यांवर वेळीच कारवाई होणे गरजेचे आहे. आज अनेक तरुण दुचाकीवरून प्रवास करताना वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत. विरुद्ध दिशेने प्रवास करणे, सुसाट वेगाने दुचाकी पळवणे, क्षमतेपेक्षा जास्त जणांना दुचाकीवर बसवणे असे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. त्यातून अपघाताच्या घटनाही वाढत असून, निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

शहरापेक्षा बायपासवरच वाहतूक पोलिसांचा ‘राबता’

शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी जेवढे वाहतूक पोलिस नेमण्यात आले आहेत त्यापेक्षा दुप्पट संख्येने वाहतूक पोलिस बायपासवर दिसून येतात. बायपास रस्त्यावर ठराविक अंतराने चार-पाच पोलिस एकत्र येऊन थांबतात आणि वाहनचालकांना थांबवून वसुली करत असल्याचे दिसून येते. जेथे शहरात वाहतुकीचे नियंत्रण करणे आवश्यक आहे तेथे न थांबता सुरळीत वाहतूक सुरू असलेल्या बायपासवर थांबून वाहतूक पोलिस आपली ‘ड्यूटी’ बजावत आहेत. त्यामुळे शहरातील चौका-चौकात वाहतूक कोंडी झाली तरी ती फोडण्यासाठी वाहतूक पोलिस तासन्तास येत नसल्याचे चित्र आहे.