निलेश लंके-किरण काळेंमध्ये चर्चा

0
23

शहर काँग्रेस उतरणार प्रचारात; आ. बाळासाहेब थोरातांची यशस्वी शिष्टाई

नगर – महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार शुभारंभाच्या पाथर्डीतील कार्यक्रमापासून अलिप्त असणार्‍या शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे आणि शहर काँग्रेसच्या नाराजी नाट्यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर पडदा पडला आहे. सोमवारी रात्री उशिरा निलेश लंके आणि किरण काळे यांच्यामध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर लंके, काळे यांनी शहर काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी एकत्रित संवाद साधला. यावेळी ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, माथाडीचे शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारदिवे, सावेडी विभाग प्रमुख अभिनय गायकवाड, काँग्रेसच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. सुजित क्षेत्रे, क्रीडा, युवक शहर जिल्हाध्यक्ष आकाश आल्हाट, शहर जिल्हा सचिव रोहिदास भालेराव, युवक सरचिटणीस आनंद जवंजाळ आदींसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. बुधवारी सायंकाळी ७ वा. शहर काँग्रेसची बैठक किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. लंके यांच्या शहरातील प्रचाराची काँग्रेसची रणनीती ठरविली जाणार आहे. लंके, काळे यांच्यातील बैठकीनंतर आता काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीकडे शहराचे लक्ष लागले आहे.