जे.एस.एस. गुरुकुलमध्ये रंगपंचमी साजरी

0
72

नगर – केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुल मध्ये विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि.३० मार्च) नैसर्गिक रंगाचा वापर करून रंगपंचमी उत्साहात साजरी केली. नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या रंगांची उधळण करीत विद्यार्थ्यांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. शाळेत विद्यार्थ्यांसाठी संगीताच्या तालावर पाणी उडविणारे कारंजेची (रेन डान्स) व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी देखील धमाल केली. हा उपक्रम शाळेचे प्राचार्य आनंद कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. आनंद कटारिया म्हणाले की, भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी जे.एस.एस. गुरुकुल मध्ये सर्व धार्मिक सण-उत्सव साजरे केले जातात. विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला पाश्चात्य संस्कृतीचा पगडा दूर करण्यासाठी त्यांच्यात शिक्षणाबरोबर संस्काराची देखील रुजवण केली जात आहे.

सण-उत्सव काळात विविध धार्मिक स्थळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांमध्ये समतेचे विचार रुजवले जात आहे. मुलांवर संस्कार शाळेतूनच घडत असतात, संस्कारक्षम व ज्ञानसंपन्न पिढी घडल्यास समाजाचा विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेच्या शिक्षिका अयोध्या कापरे म्हणाल्या की, शाळेत प्रत्येक सण पारंपारिक पध्दतीने साजरा केला जात आहे. विद्यार्थ्यांना देखील भारतीय संस्कृतीची माहिती होवून अभ्यासात गोडी वाढत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पालकांनी देखील विद्यार्थ्यांसाठी शाळेत राबविलेल्या रंगपचमीच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.