मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
23

गालफुगी कशामुळे होते?

तुमच्या एखाद्या मित्राचा वा तुमचा गाल अचानक सुजला असेल. शाळेत यायची तुम्हाला लाजही वाटली असेल, कारण हनुमानासारखे गाल फुगलेले असतील. याला गालफुगी असे म्हणतात; पण ती का होते ते आपण पाहू. गालफुगी अर्थात मम्प्स हा एक रोग असून तो मिझो या विषाणूमुळे होतो. हा विषाणू लाळ तयार करणार्‍या गालातील ग्रंथीवर आक्रमण करतो. मज्जासंस्थेवरही आक्रमण करू शकतो. यात गालावर सूज, तोंड उघडायला त्रास, वेदना, कानात दुखणे, ताप अशी लक्षणे बघावयास मिळतात. हा रोग ५ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये होतो. तसा हा रोग आपोआप ८-१० दिवसांत बरा होतो. त्यामुळे तापासारख्या लक्षणासाठी औषध देता येते. या विषाणूंना मारण्यासाठी विशिष्ट औषध नाही. या आजारात फारशा गंभीर गुंतागुंती होत नाहीत, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसते. हा रोग होऊ नये, यासाठी एक ते दीड वर्षांच्या मुलांना प्रतिबंधक लस देता येते. गालफुगी हा एक सौम्य प्रकारचा विषाणूजन्य रोग आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. तो आपोआप बरा होतो. गालफुगी झालेल्या मुलामुळे दुसर्‍यांना संसर्ग होऊ नये व गुंतागुंती होऊ नयेत म्हणून मुलाला शाळेत न पाठवणेच योग्य. श्वासांद्वारे हा रोग पसरतो. गाल सुजण्याआधी ४ ते ६ दिवस व नंतर आठ दिवस रुग्णापासून हा रोग दुसर्‍याला होऊ शकतो.