‘नगर अर्बन बँक बचाव संघर्ष समिती’ने आजच्या आज आपले काम त्वरीत थांबवावे : हाजी अन्वर खान

0
59

नगर – बँक बचाव संघर्ष समितीच्या नावाखाली बँकेच्या सभासद, ठेवीदार, कर्जदार यांची कायम दिशाभूल करुन खोटे-नाटे कार्य करुन स्वतः प्रसिध्दीत राहण्याचे कार्याशिवाय कोणतेही ठोस कार्य करु न शकलेल्या बचाव संघर्ष समितीमुळे बँकेबाबत भितीचे, घबराटीचे वातावरण तयार झाले आहे, असे हाजी अन्वर खान यांनी म्हटले आहे. नुकतेच वृत्तपत्रातून बँक बचाव संघर्ष समितीने ठेवीदार सभासदांना एकजुट होण्याचे आवाहन केले व आपण उदासिनता दाखविल्यास संघर्ष समिती यापुढे आपले काम थांबविणार असल्याचे वृत्तपत्रात दिले आहे. वास्तविक पाहता आमच्या माहितीप्रमाणे बँकेची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. बँकेकडे स्वतःची स्थावर, जंगम मालमत्ता असून सभासदांच्या ठेवी या सुरक्षित आहेत. शंभरी पार केलेल्या नगर अर्बन बँकेवर सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतकांचा दृढ विश्वास असून बँकेची सर्व ठेवीदारांची संपुर्ण रक्कम देण्याएवढी ऐपत असतांना अजुनही ठेवीदारांची संपुर्ण रक्कम मिळणार नाही, उशिराने मिळेल वगैरे खोटे-नाटी दिशाभूल करुन सभासदांना एकत्र करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालु आहे. आपण जर सामंजस्याने एकत्र बसुन, चर्चा करुन मार्ग काढण्याची सुरुवातीपासूनच कोणतीही ठोस भूमिका न घेता उलट बँक वाचविण्यापेक्षा बँक कशी बंद होईल व इतर पतसंस्था, बँका कशा वाढतील असेच प्रयत्न केल्याचे नागरीकांमध्ये चर्चा आहे. आपल्या बँक बचाव संघर्ष समितीच्या उठसुट नगर अर्बन बँकेवर कायम खापर फोडल्यामुळेच व जिवाचा आटापिटा करुन बँक परवाना रद्द होण्यासाठी प्रयत्न केल्याचे अनेकांना वाटत आहे.

आपल्या या कृतीमुळे सर्व कर्जदारांना बँकेवर नेमलेल्या अवसायाकाच्या नावाखाली कर्जफेडीला मुदत असतांना सुध्दा आधीच संपुर्ण कर्ज रक्कमेचा भरणा करण्याचा हुकूमशाही, दंडेली, खाजगी सावकारीसारखा कायद्याच्या बडग्याच्या नावाखाली अवसायकाच्या अधिकाराचा गैरवापर बँकेत होत आहे. यामुळे कर्जदार, ठेवीदार यांची मानसिकता खराब झाली असून कर्जदार अतिशय तणावात आहे. कर्ज रक्कम कोठुन उभी करावी हा गंभीर प्रश्न कर्जदारांना भेडसावत आहे. मुळात कर्जफेडीला मोठी मुदत असतांना कर्जाची गरज असल्याने घेतलेले कर्ज एकरकमी भरणे शय नाही यासाठी आपल्या समितीने अवसायकाकडे काय प्रयत्न केला याचा खुलावा करावा. सभासद, ठेवीदार, कर्जदार यांना आपण कोणतेही सहकार्य केले नाही. बैलगाडी खाली सोबत चाललेल्या …….सारखे आपणास वाटते की आम्ही बँक बंद करुन खुप मोठे काम केले, बँक वाचवली परंतु प्रत्यक्षात असे काहीही झालेले नसून आपल्या कृत्यानेच बँकेची बदनामी झाली असल्याचे नागरीकांमध्ये चर्चा आहे. त्यामुळे आपण बँक बचाव संघर्ष समितीचे कार्य त्वरीत आजच्या आज थांबवावे, असे आवाहन नगर अर्बन बँकेचे हाजी अन्वर खान यांनी केले आहे.