मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
33

नारू म्हणजे काय?

‘नारू, नारू निर्मूलन’ या गोष्टी अनेकदा ऐकायला मिळतात. तसेच, नारूमध्ये शरीरातून धाग्यासारखे जंतू बाहेर येतात असेही आपण कुठेतरी वाचलेले असते. नारू हा ड्रॅकन्युलस मेडीनेन्सीस नावाच्या जंतापासून होणारा रोग आहे. त्वचेखालच्या भागात हा जंत राहतो. या रोगामुळे रुग्ण मरत नसला, तरी हैराण मात्र होतो. नारूची प्रौढ मादी रुग्णाच्या शरीरात सामान्यपणे पायाच्या त्वचेखालील असते. तिची लांबी ५५ ते २२० सेंमी. एवढी असते. तर नर २ ते ३ सेंमी लांब असतो. फलन झालेली मादी रुग्णाच्या अंतःत्वचेत दाह निर्माण करते व परिणामी पायाच्या त्वचेवर फोड येतो. अशी व्यक्ती पाण्यात गेल्यास हा फोड फुटतो व मादी पाण्यात सुमारे १० लाख इतया सूक्ष्म अळ्या सोडते. पाण्यातील सायलोप नावाची कीटक या अळ्यांना खातात. सायलोपच्या शरीरात त्या अळ्यांचा विकास होतो. दुसर्‍या निरोगी व्यक्तीने हे पाणी प्याले, तर पाण्यातील सायलोप्स त्याच्या पोटात जातात. जठरात सायलोपचे पचन होते व या अळ्या बाहेर पडतात. कालांतराने या अळ्या लहान आतड्यातून बाहेर पडतात. मजल दरमजल करत त्वचेखालच्या भागात पोहोचतात. ९ ते १२ महिन्यांत अळ्यांची पूर्ण वाढ होऊन त्यांचे मादी व नर तयार होतात व पुन्हा हे चक्र चालू राहते. नारू टाळण्याचे अनेक उपाय आहेत, पण परिणामकारक उपचार नसल्याने त्याचा प्रतिबंध करणेच जास्त महत्त्वाचे ठरते. पायर्‍या असलेल्या विहिरीमुळे याचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे विहिरींना पायर्‍या नसाव्यात, त्या पया बांधणीच्या असाव्यात. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी वारंवार बाहेर खावे प्यावे लागणार्‍या लोकांनी रुमालाची चौपदरी घडी पाण्याच्या ग्लासवर ठेवावी व पाणी गाळून प्यावे, त्यामुळे सायलोप्स पोटात जाणार नाहीत व नारू होणार नाही. पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा, सायलोप्स मारण्यासाठी किटकनाशकांचा वापर व लोकांना आरोग्यशिक्षण या तीन मार्गांनी हा रोग नियंत्रणाखाली आणता येईल. भारत सरकारने केलेल्या अविरत परिश्रमांमुळे पाच वर्षांपूर्वी या रोगाचे आपण निर्मूलन करू शकलो आहोत. देवी नंतर देशातून निर्मूलन झालेला हा दुसरा रोग आहे.