हृदयविकार म्हणजे काय?
हृदयविकार याचा शब्दशः अर्थ हृदयाचे रोग असा होतो. मग त्यात हृदयाच्या स्नायूंचे रोग, झडपांचे रोग, कर्करोग, रक्तदाबामुळे वा श्वसनसंस्थेच्या रोगांमुळे हृदयावर होणारे विपरित परिणाम इत्यादींचा समावेश होतो; पण सामान्यपणे लोक हृदयविकार म्हणजे हृदयविकाराचा झटका असेच समजतात. हृदयाच्या सर्व रोगांचे विश्लेषण करणे शय नाही. त्यामुळे आपणही याच दृष्टीने हृदयविकाराचा विचार करू. हृदय आपल्या शरीरात पंपाचे कार्य करते. हृदयाचे सतत आकुंचन प्रसरण होत असते. यामुळे शुद्ध रक्ताचा संपूर्ण शरीराला पुरवठा होतो. या महत्त्वाच्या कार्यात व्यत्यय येऊन चालत नाही. हृदयाचे हे कार्य अविरतपणे चालू असते. त्याला विश्रांती मिळते ती एकदाच- मृत्यूच्या वेळी. इतकेच हृदयाचे महत्त्व! असे कार्य करण्यासाठी हृदयालाही (म्हणजे त्याच्या स्नायूला) रक्तपुरवठा होणे आवश्यक असते. यासाठी रक्तवाहिन्या असतात. काही रोगांमध्ये या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. साहजिकच हृदयाचा रक्तपुरवठा कमी होतो वा बंद पडतो. रक्तपुरवठा बंद पडल्याने संबंधित भागातील पेशीसमूह मरतात. हे अचानक होत असल्याने त्याला हृदयविकाराचा ‘झटका’ असे नाव पडले आहे. लठ्ठपणा, जास्त प्रमाणात मेद पदार्थांचे सेवन, बैठे काम, अतिरक्तदाब, मधुमेह, मद्यपान, धूम्रपानाची सवय इत्यादी असणार्यांच्या बाबतीत हा रोग होण्याची शयता जास्त असते. हृदयाच्या स्नायूचा जास्त भाग प्रसरण पावला, तर शस्त्रक्रिया बंद पडून रुग्ण दगावल्याची शयता असते. योग्य वेळी उपचार झाल्यास मृत्यूचे प्रमाण खूप कमी होते. सुरुवातीला श्रमानंतर छातीत दुखणे अशी इशारेवजा लक्षणे दिसून येतात. त्याच वेळी उपचार केल्यास पुढील अनर्थ टळू शकतो. हृदयाभिलेखाचा रोगनिदानासाठी चांगला उपयोग होतो. रक्तवाहिनीतील अडथळा काढण्यासाठी बायपास शस्त्रक्रिया करता येते. हृदयविकार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो टाळलेलाच बरा. दररोज व्यायाम, आहारात मेदपदार्थ कमी खाणे, मद्यपान, धूम्रपान न करणे, उच्च रक्तदाब उपचाराने आटोयात राखणे; अशा उपायांनी हृदयविकाराचा प्रतिबंध करता येईल