भाजपच्या शहर कार्यालयाबाहेर दोन्ही पक्षांकडून घोषणाबाजी; हस्तक्षेप करत पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
नगर – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ नगर शहरातील भाजप कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्यावतीने शुक्रवारी (दि.२२) दुपारी घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यालयात असलेले भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही बाहेर आले व त्यांनी ही घोषणाबाजी केली. नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत ‘आप’ च्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी (दि.२१) रात्री ईडीने अटक केली आहे. त्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत. आप चे कार्यकर्ते ठिकठिकाणी भाजपाच्या कार्यालयांच्या बाहेर निदर्शने, आंदोलने करत आहेत. नगरमध्येही शुक्रवारी (दि.२२) दुपारी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते शहर भाजपच्या गांधी मैदानाजवळ असलेल्या कार्यालयाबाहेर जमा झाले व त्यांनी केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. दरम्यान ही घोषणाबाजी सुरु झाल्यावर भाजप कार्यालयात उपस्थित असलेले शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, सचिन पारखी, महेश नामदे, वसंत लोढा, रामदास आधळे, मयूर बोचुघोळ, प्रशांत मुथा यांच्यासह अन्य पदाधिकारी देखील कार्यालयातून खाली आले. त्यांनी देखील घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. दोन्हीही पार्टीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर कोतवाली पोलिसांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे तणाव काहीसा निवळला. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांवर कारवाई बाबत दुपारी उशिरापर्यंत कार्यवाही सुरु होती.