शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून नफ्याचे अमिष दाखवत निवृत्त सैनिकाची ३१.७० लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक

0
55

नगर – शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत दोघा भामट्यांनी भिंगारमध्ये राहणार्‍या निवृत्त लष्करी जवानाची तब्बल ३१ लाख ७० हजारांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुरुवारी (दि.२१) सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नीरजकुमार नागेश्वर ठाकूर (वय ३९, रा. विजय लाईन, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी नीरजकुमार हे भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेले असून भिंगार च्या विजय लाईन मध्ये राहतात. त्यांना २२ डिसेंबर २०२३ रोजी मोबाईल वर इंस्टाग्राम पाहत असताना शेअर ट्रेडिंग बाबत मोफत मार्गदर्शन करण्यात येईल अशी लिंक दिसली. त्यांनी ती ओपन केल्यावर ते एका व्हाटसअप ग्रुप मध्ये जॉइन झाले. या ग्रुप मधील एक महिला व एक पुरुष यांनी त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांना शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवले. त्यांच्यावर विश्वास बसल्याने फिर्यादी यांनी तेव्हापासून ते ४ मार्चपर्यंत ते सांगतील तसे ऑनलाईन सुमारे ३१ लाख ७० हजार रुपये त्यांना पाठविले. मात्र ३ महिन्यात १ रुपयाचाही परतावा न मिळाल्याने त्यांनी त्या दोघांना गुंतवलेले पैसे परत मागण्यास सुरुवात केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देवून पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी गुरुवारी (दि.२१) सायंकाळी सायबर पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात दोन मोबाईल नंबर धारकांवर भा.दं.वि.कलम ४१९, ४२० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक दिनेश आहेर करीत आहेत.