नंदीवाले समाजाची पिढ्यान्‌पिढ्याची भटकंती थांबविण्यासाठी शासनाने हक्काचा निवारा द्यावा

0
22

नगर – भूमिहीन बेघर तिरमली नंदीवाले समाजाच्या वतीने हक्काचा निवारा मिळण्याची मागणी करण्यात आली. समाजाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांची भेट घेवून निवेदन दिले. यावेळी बाबू काकडे, सुहास सोनवणे, पोपट बनकर, अ‍ॅड. महेश शिंदे, सुनील सकट, गुलाब काकडे, उत्तम फुलमाळी, गुलाब फुलमाळी सुरेश काकडे, सुभाष काकडे, गोपाळ आव्हाड, अण्णा फुलमाळी, साहेबा औटी, माणिक शिंदे, योगेश शिंदे, साहेबा फुलमाळी, बाळू काकडे, रावसाहेब फुलमाळी, रावसाहेब काळे, संगीता काकडे, गंगा पालवे, राणी आव्हाड, सहादू काकडे, भानुदास काकडे, सुभाष फुलमाळी, गंगा मल्ले, बाळू पवार, गंगा फुलमाळी आदींसह तिरमली नंदीवाले समाज बांधव उपस्थित होते तिरमली नंदीवाले समाज पूर्वीपासून भटका समाज आहे. नंदीबैल घेऊन गावोगावी भटकंती करून मिळेल तेथे मजुरी करून उदरनिर्वाह करणारा हा समाज आहे. कायम पिढ्यानपिढ्या भटकंती करीत असल्याने शिक्षणापासून, जातीच्या दाखल्यापासून, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेपासून व मूलभूत गरज म्हणजे हक्काच्या घरापासून वंचित आहेत. कोणाकडेही स्वत:ची शेतजमीन नाही. अठराविश्व दारिद्रयात खितपत पडलेले असून, त्यांना हक्काच्या घरांची गरज असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी तिरमली नंदीवाले समाजबांधव सुशिक्षित नाही. पिढ्यानपिढ्या भटकंती थांबविण्यासाठी त्यांना शासनाने निवारा द्यावा. महाराष्ट्रातील तिरमली समाजाच्या घरकुलसह विविध समस्यांसाठी लढा उभारण्याचा निर्धार समाजाचे कार्यकर्ते तथा मुंबादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबू काकडे यांनी केले. अ‍ॅड. महेश शिंदे यांनी वंचित गोरगरीब कुटुंबाला हक्काचा निवारा मिळणे हा त्याचा मुलभूत अधिकार आहे. या समाजातील वंचित घटकांच्या घरासाठी जागा मिळावी, म्हणून महाराष्ट्रभर चळवळ उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तिरमली समाज बांधवांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भावना सुहास सोनवणे यांनी व्यक्त केली.