सातासमुद्रापलिकडे जाऊन झेंडा फडकवलेले आई – बापाला न्याय देण्यात असफल ठरतात : वसंत हंकारे

0
34

भगवान महावीर व्याख्यानमाला : प्रथम पुष्प

भगवान महावीर व्याख्यानमालेचे पहिले पुष्पमध्ये ‘बाप नावाचा माणूस’ या विषयावर बोलतांना वसंत हंकारे (सांगली) समोर उपस्थित जनसमुदाय. याप्रसंगी श्री. हंकारे यांचा मोत्याची माळ घालून सन्मानचिन्ह देवून सत्कार करताना उद्योगपती नरेंद्र फिरोदिया.

नगर – डॉटर, वकिल, इंजिनिअर झालेले अन् साता समुद्रापलिकडे जाऊन झेंडा फडकवलेले आई-बापाला न्याय देण्यात असफल ठरतात, असे प्रतिपादन समाज परिवर्तनकार वसंत हंकारे (सांगली) यांनी केले. राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री.आदर्शऋषिजी महाराज यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन आयोजित भगवान महावीर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ’बाप नावाचा माणूस’ या विषयावर गुंफताना ते बोलत होते. उद्योगपती नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते वक्ते वसंत हंकारे यांचा सन्मान मोत्यांची माळ आणि सन्मानचिन्ह देवून करण्यात आला. श्री.हंकारे पुढे म्हणाले, डॉटर, इंजिनिअर, वकिल नाही झालात तरी चालेल पण आई-बापाला जपा. त्यांच्या कष्टाचे पांग फेडा. आमच्यासाठी काय ठेवले? असा सवाल आई-बापाला कदापी करू नका. त्यांचे मन दुखवू नका. छत्रपती शिवरायांसारखे स्वतःच्या कर्तृत्वावर मोठे व्हा. छत्रपती संभाजींसारखी हिंमत बाळगा. चारित्र्यवान व्हा. जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंतच आई-बापांच्या श्वासावर प्रेम करा. श्वास निघून गेल्यावर आई-बाप अन् नाती कळतात. लाखो रूपये हाती असल्याने शहराला जेवण घालू शकाल पण फोटोतील आई-बापाला एक तरी घास खाऊ घालू शकाल का? जीवनात कधीतरी आनंदाने एक घास बापाला आनंदाने भरवला नाही. एक चप्पल जोड आणून दिला नाही. शर्ट आणून दिला नाही. त्यांच्या मिठीतला आनंद मिळवला नाहीत. ज्या आई-बापामुळे हा जन्म मिळाला, हे शरिर मिळाले त्याच जन्मदात्यांना वृध्दाश्रमात ठेवण्याचे पाप करू नका. आई-बापाच्या वेदना समजून घ्या. आई बाप नसलेले घर वाळवंट असते. करोडोंचा बंगला, लाखो रूपयांची गाडी, बायकोच्या अंगावर भरपूर दागिने पण आई-बापच कळले नाहीत तर या श्रीमंतीची किंमत शून्य! मुलींनो २० वर्षे तळहाताच्या फोडासारखे जपलेले आई-बाप तुम्हाला क्षणात दुश्मन वाटतात अन् ओळख नसलेला संस्कारहिन मुलगा आपला वाटतो. त्या हरामखोरासोबत निघून जाताना आई बापाला ओळखत नाही, असे पोलिसांसमोर म्हणता. स्वतःची अंडरपॅन्ट विकत घ्यायची लायकी नसलेल्यांच्या खोट्या प्रेमासाठी आई-बापाच्या प्रेमावर थुंकून जाऊ नका. आपल्या आई-बापाने जगायचे कसे? याचा थोडा तरी विचार करा. मुलांनो, सूक्ष्म जीव सुध्दा आपल्या हातून मरू नये ही आपली संस्कृती असताना ढाब्यावर बसून मांसाहार करता? जीवंतपणी आई बापाला मारहाण करता? ज्या आई-बापाने तुम्हाला जन्म दिला. ज्या मातीने, गावाने, धर्माने राष्ट्राने, देशाने घडवले. त्यांच्याविषयी कायम कृतज्ञता बाळगा. नववधू सासरी निघाली की आई खूप रडली असे दिसते. पण प्रत्यक्षात आईच नव्हे तर मांडवातील सर्वांपेक्षा अधिक रडतो तो देवमाणूस बापच! बाप नसता तर तुमचा जन्म झाला असता का? विचार करा. हाच तुमचा विठ्ठल, हाच तुमचा तिरूपती, हाच तुमचा साईबाबा…ज्यांना आई-बापच कळले नाही त्यांना मंदिरातील देव तरी कसे पावणार? असा सवाल करत वसंत हंकारे यांनी व्याख्यानाची सांगता केली. मात्र अनेक मुलींनी आपल्या पित्याला घठ्ठ मिठी मारत डोळ्यातील आसवांना वाट करून दिली. ते पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. सरोज कटारिया यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. प्रसाद बेडेकर यांनी आभार मानले. व्याख्यानाचा पहिलाच दिवस असूनही प्रेक्षागृह तुडूंब भरलेले दिसत होत