नगरमधील खंडोबा मंदिरातून चोरी

0
53

दानपेटीतील रक्कम, पितळी घंटा, ध्वनीक्षेपक यंत्रणा पळविली; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नगर – नगर शहरापासून जवळच असलेल्या पिंपळगाव माळवी गावच्या शिवारातील शिवमल्हार गडावरील श्री खंडोबा मंदिरात अज्ञात चोरट्याने धाडसी चोरी करत मंदिरातील दानपेटीतील रक्कम, पितळी घंटा, ध्वनीक्षेपक यंत्रणा पळविली असल्याचे समोर आले आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. याबाबत योगेश भाऊसाहेब झिने (रा. पिंपळगाव माळवी, ता.नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.२०) सायंकाळी फिर्याद दिली आहे. पिंपळगाव माळवी गावच्या शिवारात डोंगरावर श्री खंडोबा मंदिर असून या मंदिराला व परिसराला शिवमल्हार गड म्हणून ओळखले जाते. या मंदिरात भाविकांची नेहमीच वर्दळ असते. मंदिराच्या पुजार्‍यांनी मंगळवारी (दि.१९) रात्री मंदिराच्या दरवाजाला कुलूप लावून ते बंद केले होते. बुधवारी पहाटे पुजारी पुन्हा मंदिरात पूजा करण्यासाठी गेले असता त्यांना मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी आतमध्ये जावून पाहिल्यावर तेथे चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे स.पो.नि. माणिक चौधरी यांनी पोलिस पथकासह तेथे जावून पाहणी केली. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर एका चोरट्याने मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत गाभार्‍यात ठेवलेली ध्वनीक्षेपक यंत्रणा, ७ किलो वजनाची पितळी घंटा व दानपेटीतील रक्कम असा ऐवज चोरून नेल्याचे दिसून आले आहे. सदर सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले असून अज्ञात चोरट्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ४५७, ३८० प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.