केडगाव येथील ‘त्या’ अंगणवाडी सेविकेला बडतर्फ करण्यात यावे

0
43

पालकांनी वाचला बालविकास अधिकार्‍यांसमोर तक्रारीचा पाढा नगर – केडगांव भूषणनगर जवळील शिवाजीनगर अंगणवाडी क्र. ९६ (२) च्या अंगणवाडी सेविकेचे गैरवर्तन व गैरव्यवहाराबद्दल तत्काळ बदली व चौकशी करून बडतर्फ करण्याची मागणी पालकांनी एकात्मिक महिला व बालविकासचे प्रकल्प अधिकारी महादेव जायभाये यांच्याकडे केली. सदर सेविका लहान मुलांना अमानुषपणे मारहाण करणे, आहार न देणे, पुरक आहार न देणे, पतीला पूर्णवेळ घेऊन गर्भवती व बाळंतीन महिलांसमोर बसणे, संकोच वाटेल असे करणे, शासनाच्या योजना लाभार्थ्यापर्यंत न पोहचवणे, पालकांनी जाब विचारल्यास आपल्या गुंड मुलाला सदर पालकांस धमकावायला लावणे, केडगांवातील गुंडाशी आमचे नातेसंबंध आहेत अशी दहशत निर्माण करणे अशा प्रकारच्या गंभीर तक्रारी पालकांनी केल्या. अंगणवाडी सेविकेचे अनेक गैरकृत्य व गैरप्रकार रोखण्यासाठी पालकांनी अनेकवेळा तक्रारी अधिकार्‍यांकडे केल्या होत्या.

नोटीस काढून योग्य समज अधिकार्‍यांनी दिली होती. परंतू सदर सेविकेच्या वर्तनात कुठलीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे सर्व पालक केडगाव जागरूक नागरिक मंचकडे तक्रार घेऊन गेल्यानंतर मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांनी मंचच्या महिला अध्यक्षा शारदा शिरसाठ यांच्याकडे प्रकरण सोपवले. सर्व पालकांना व मंचच्या पदाधिकर्‍यांना सोबत घेऊन शिरसाठ यांनी पाठपुरावा सुरू केला. दहशत अधिक वाढल्यास पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा विश्वास पालकांना संघटनेच्या वतीने देण्यात आला. एकात्मिक महिला व बालविकासचे प्रकल्प अधिकारी यांनी पालकांची कैफियत ऐकण्यासाठी शिवाजीनगर येथे बोलावले होते. सर्व पालकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असलेल्या दहशतीचा उलगडा अधिकारी यांच्या समक्ष केला. सदर सेविकेची तत्काळ बदली व सविस्तर चौकशी करून बडतर्फीची कारवाईची मागणी करण्यात आली. अधिकर्‍यांनी योग्य व कठोर कारवाई करण्याचे संबंधितांना आश्वासन दिले.