४ गुन्हे झाले उघड, ८ तोळे सोने एलसीबी पथकाने केले हस्तगत
नगर – नगर जिल्ह्यात रस्त्याने चाललेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून नेणार्या ३ सराईत गुन्हेगारांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या गुन्हेगारांकडून ४ चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघड झाले असून त्यांच्या कडून ८१ ग्रॅम (८ तोळे) सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. सिताराम ऊर्फ शितल ऊर्फ गणेश भानुदास कुर्हाडे (वय ३५), राहुल अनिल कुर्हाडे (वय १९) व सचिन मधुकर कुर्हाडे (वय ३२, सर्व रा. चितळी स्टेशन, ता. राहाता) अशी या गुन्हेगारांची नावे असून त्यांच्यावर नगर, नाशिक व पुणे जिल्ह्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. नगर जिल्ह्यात झालेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले होते. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव तसेच अंमलदार दत्तात्रय हिंगडे, रविंद्र कर्डीले, मनोहर गोसावी, संदीप पवार, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, भिमराज खर्से, फुरकान शेख, अमृत आढाव व मेघराज कोल्हे अशांचे पथक नेमुन तपास सुरु केला होता.
हा तपास करत असताना पथकाने कोपरगांव, शिर्डी, राहाता व लोणी परिसरातील चेन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत व घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन त्यामधील आरोपींचे वर्णन व गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल याच्या आधारे तपास करुन मोटार सायकलवरील इसमापैकी एक संशयीत इसम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार सिताराम ऊर्फ शितल ऊर्फ गणेश कुर्हाडे हा असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने त्यास चितळी येथुन ताब्यात घेतले व त्याचेकडे कसून चौकशी केल्यावर त्याने त्याचे इतर साथीदार राहुल कुर्हाडे व सचिन कुर्हाडे यांचे सोबत लोणी, राहाता व शिर्डी परिसरातुन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केले असुन चोरी केलेले सोने सचिन कुर्हाडे याचेकडे ठेवले आहे असे सांगितले. पोलिस पथकाने राहुल कुर्हाडे व सचिन कुर्हाडे यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेता त्यांच्याजवळ एका पिशवीत सोन्याचे दागिने मिळुन आले. त्याबाबत विचारपुस करता त्यांनी महिलांच्या गळ्यातील चोरी केलेले सोने असल्याचे सांगितल्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या तिघांकडून ४ गुन्हे उघड झाले आहेत.