नगर – नगर शहरालगत असणार्या स्टेट बँक चौक, शहापूर मेहेकरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे निकृष्ट काम ग्रामस्थांनी एकत्र येवून बंद पाडले. यावेळी अधिकार्यांना बोलावून घेत त्यांच्याकडूनही या कामाची पाहणी करून घेण्यात आले. या रस्त्यावरील खड्ड्यात पडून आतापर्यंत अनेक बळी गेलेले आहेत. लोकांचे जीव घेणारे हे खड्डे बुजून रस्ता दुरुस्ती करावी, या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने अनेक वेळा राष्ट्रीय महामार्गाच्या उपअभियंतांच्या दालनात आंदोलने केलेली आहे. या आंदोलनाची दखल घेत ६० लाख रुपयांचा निधी स्टेट बँक चौक शहापूर ते मेहेकरी दरम्यानच्या खड्डे बुजविण्याच्या कामासाठी मंजूर झालेले आहे. या खड्डे बुजवण्याच्या कामाला २ दिवसांपासून सुरुवात करण्यात आली. मात्र शहापूर येथील पेट्रोल पंपासमोर खड्डे बुजवीत असताना खडीमध्ये मातीचे प्रमाण जास्त असून, डांबर चिटकत नव्हते. त्यामुळे सदर कामाची पाहणी ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्यासह कृष्णा बेरड, रामदास लगड, राम बेरड, ज्ञानदेव काळे, भानुदास नाटक, अरुण नाटक आदीसह गावकर्यांनी केली. एक दिवसापूर्वी बुजवलेले खड्डे हाताने व खोर्याने सहज उकरले जात होते. त्यामुळे हे निकृष्ट दर्जाचे काम तातडीने बंद करण्यात आले व अधिकार्यांना बोलवून घेतले. अधिकार्यांनी देखील निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी केली.