नागपूरला झालेल्या चेंगराचेंगरीची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी

0
39

मयत झालेल्या महिलेच्या वारसांना आर्थिक मदत व नोकरी देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या शिष्टमंडळाचे निवेदन

नगर – नागपूर येथे बांधकाम कामगारांना भांडीचे किट वाटप कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी व चेंगराचींगरीत मयत झालेल्या महिलेच्या वारसांना ५० लाख रुपये मदत देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. शहरातील बसपाचे पदाधिकारी तथा माजी प्रदेश कार्यकारणी सदस्य शंकर भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबई येथील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयात अधिकार्‍यांना निवेदन दिले. यावेळी निसार शेख, हरीश नारायणकर आदी उपस्थित होते. नागपूर येथे भाजपच्या वतीने बांधकाम कामगारांना भांडीचे किट वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. साहित्य वाटपाच्या ढिसाळ नियोजनामुळे मोठ्या प्रमाणात कामगारांची गर्दी होवून चेंगराचेंगरी झाली. असंख्य बांधकाम कामगारांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले. यामध्ये अनेक कामगार जखमी झाले. तर यमुनाबाई राजपूत या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे दुर्घटना फक्त नियोजनाच्या अभावामुळे घडली असल्याचा आरोप बसपाच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कायदेशीर गुन्हे दाखल करावे, चेंगराचींगरीत मयत झालेल्या महिलेच्या वारसांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी व त्या महिलेच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा बहुजन समाज पार्टीच्या वतीने कामगार कल्याणकारी मंडळाच्या प्रवेशद्वारासमोर जन आक्रोश धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.