मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
33

माणूस कोणकोणते अवयव दुसर्‍याला दान करू शकतो?

दानाचे माहात्म्य फारच मोठे आहे. अन्नदान, वस्त्रदान, तसेच आर्थिक मदत इत्यादींना आपल्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. दानशूर कर्णाच्या गोष्टी तुम्ही वाचल्या असतीलच; परंतु या सर्व दानांपेक्षाही मौल्यवान असे दान सामान्यातला सामान्य माणूस देऊ शकतो. आश्चर्य वाटले ना? पण हे अगदी खरे आहे. हृदय, नेत्र, यकृत, मूत्रपिंड, अस्थिमज्जा, त्वचा इत्यादी अवयवांचे माणूस दुसर्‍याला दान करू शकतो. मेंदूचे कार्य थांबल्यास व्यक्तीला मृत समजावे, असा कायदा भारतीय संसदेने मंजूर केल्यामुळे इंद्रियदान करणे वा इंद्रियारोपण करणे शय झाले आहे. डोळ्यात फूल पडल्याने वा जखम झाल्याने नेत्रपटल निकामी झालेल्या लोकांना मृत व्यक्तीचे नेत्रपटल बसवतात. यामुळे त्यांना दृष्टी प्राप्त होते. यालाच नेत्रदान म्हणतात. मूत्रपिंड खराब झालेल्या व्यक्तीचे जवळचे वा रक्ताचे नातेवाईक त्याला स्वतःचे मूत्रपिंड दान करू शकतात. सामान्यपणे सर्वसामान्यपणे व्यक्तींना दोन मूत्रपिंडे असल्याने त्यापैकी एक दान केले तरी एका मूत्रपिंडाच्या द्वारे आयुष्यभर कार्य केले जाते. साहजिकच एका रूग्णाचे प्राण वाचतात.

अपघातामध्ये मेंदूला जबर दुखापत झाल्याने मेंदू निकामी झालेल्या रुग्णाचे हृदय, नेत्र, यकृत, मूत्रपिंड असे अवयव काढून घेऊन गरजू रुग्णाचे प्राण वाचवता येतात. मरणोत्तर काही व्यक्ती देहदानही करू शकतात. यासाठी मरणोत्तर पोस्टमार्टेम झालेले नसावे. तसेच शरीरातील अवयव शस्त्रक्रियेने काढलेले नसावे. वैद्यकीय विद्यार्थ्यांना शरीररचना अभ्यासासाठी त्याची मदत होते. अस्थिमज्जा नष्ट झालेल्या व्यक्तींना अस्थिमज्जा दुसर्‍या निरोगी व्यक्तीने दान करावी लागते. अशा प्रकारे माणूस अनेक अवयवांचे दान करू शकतो. काही जिवंतपणी तर काही मरणोत्तर. “मरावे परी किर्तीरूपी उरावे.” या उक्तीची प्रचिती या दानामुळे येऊ शकते.