मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज

0
32

खुपर्‍या म्हणजे काय?

खुपर्‍या हा डोळ्यांचा एक रोग आहे. नेत्र आवरण व नेत्र पटल या दोहोंना लॅमिडीया ट्रॅकोमॅटीस नावाच्या जंतूंचा संसर्ग झाल्यास हा रोग होतो. या जंतूखेरीज इतर काही जंतूही संसर्ग करू शकतात. जगात सुमारे १५ कोटी लोकांना हा रोग आहे. हा रोग झाल्यानंतर सुरुवातीला डोळ्यात वाळूचे कण गेल्याप्रमाणे वाटत राहते. त्यामुळे रुग्ण डोळे चोळतो. प्रत्यक्षात मात्र डोळ्यात काहीच गेलेले नसते. पापण्या उलटून पाहिल्यास पांढरट ठिपके दिसतात. कालांतराने पापण्यांच्या कडा डोळ्यांच्या दिशेने वळतात व पापण्यांचे केसही डोळ्यात शिरू लागतात. वेळीच उपचार न केल्यास पापण्या आखडतात, बुबुळावर फूल पडते व दृष्टी जाते. भारतातील एकूण अंधत्वापैकी ०.२% अंधत्व खुपर्‍यांमुळे आलेले असते. खुपर्‍या हा रोग रुग्णांच्या डोळ्यातील स्रावांशी निरोगी लोकांच्या डोळ्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संपर्क आल्याने पसरतो. यात बोटांद्वारे, हातरुमालाद्वारे, टॉवेलद्वारे वा काजळामार्फत रोग एकापासून दुसर्‍याला होतो. प्रखर सूर्यप्रकाश, धूळ, धूर व काजळ किंवा सुरमा यांसारख्या डोळ्यात जळजळ निर्माण करणार्‍या पदार्थांमुळे ट्रॅकोमा वा खुपर्‍या हा रोग होण्यास सहाय्य होते. हा रोग बरा होतो. टेट्रासायलीन वा एरिथ्रोमायसीन यांचे डोळ्यासाठीचे मलम दररोज एकदा असे लागोपाठ साठ दिवस डोळ्यात टाकल्यास रोग बरा होतो. या ऐवजी दररोज एकदा असे प्रत्येक महिन्याच्या दहा दिवस औषध देता येते. हे मात्र सहा महिने सातत्याने घ्यावे लागते. वैयक्तिक स्वच्छता राखल्यास व डोळे कायम स्वच्छ ठेवल्यास खुपर्‍या या रोगाचा प्रतिबंध करता येतो. त्याचप्रमाणे संत्रे, मोसंबी, लिंबू अशी ‘सी’ व्हिटॅमीन असलेली फळे खाणेही उपयुत ठरते.