नगर अर्बन बँक घोटाळ्यातील ३ आरोपींना जामीन नामंजूर

0
95

नगर – नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या तिघांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत सित्रे यांनी नामंजुर केला आहे. बँकेचा माजी संचालक अनिल चंदुलाल कोठारी (रा. माणिकनगर, नगर), बँकेचा माजी अध्यक्ष अशोक माधवलाल कटारिया (रा. टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर) व बँकेचा तज्ञ संचालक व सीए शंकर घनशामदास अंदानी (रा. भगत मळा, सावेडी) यांचा जामीन अर्ज नामंजुर करण्यात आला आहे. बँकेत २९१ कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याप्रकरणी माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. फॉरेन्सिक ऑडिटनुसार स्पष्ट झालेल्या गैरव्यवहाराची तपासणी करून कारवाई केली जात आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोठारी, कटारिया, अंदानी यांना अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केले होते. त्यावर सुनावणी झाली असता सरकारी पक्षाच्यावतीने युक्तीवाद करण्यात आला. सन २०१४ ते २०२९ या काळात सदर संशयित आरोपी यांनी अनेक कर्ज प्रकरणात खोटे कागदपत्रे, मिळकतीचे बनावट अहवाल इतर बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रकरणे मंजुर केली.

सदर संशयित आरोपी यांच्या खात्यावर संशयास्पद रक्कम आल्याचे दिसून येत आहे. ऐपत नसलेल्या व्यक्तींना कर्ज मंजूर केलेले दिसून येत आहे. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये अटकेतील तिघांचा अनेक कर्ज प्रकरणात सहभाग दिसून येत आहे. वरील तिघांनी बँकेच्या संचालक पदावर असताना गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. कटारिया याच्या खात्यावर ४५ लाख रूपये जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच अंदानी याच्या खात्यावर आठ लाख रूपये आल्याचे दिसून आले आहे. घोटाळ्यात सहभागी असलेले अनेक संचालक पसार झाले असून त्यांना अटक करायची असून तिघांचा जामीन अर्ज नामंजुर करण्यात यावा असा युक्तीवाद सरकारी वकील अनिल घोडके, मंगेश दिवाणे यांनी केला. मुळ ठेविदारांच्यावतीने अ‍ॅड. अच्युत पिंगळे यांनी बाजू मांडली. सरकारी वकील व ठेविदारांच्या वकीलांची बाजू ग्राह्य धरून न्यायाधीश सित्रे यांनी कोठारी, कटारिया, अंदानी यांचे जामीन अर्ज नामंजुर केले आहेत.