शहरालगतच्या गायके मळा परिसरातील अनेक कुत्र्यांचा बिबट्याने पाडला फडशा

0
83

नगर – शहराजवळील गायके मळा व लिंक रोड परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे समोर आले असतानाच एमआयडीसी परिसरात असलेल्या साईबन परिसरातही बिबट्याच्या पिल्लाचे दर्शन झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वनविभागाने या बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. गायके मळा येथील शेतकरी शिवाजी विश्वनाथ गायके यांच्या शेतामध्ये व आसपासच्या वस्त्यांमध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून बिबट्या व त्याचे पिल्लू वावरताना त्यांना स्वतः दिसून आले आहे.

नागरिकांमध्ये भीती; साईबन परिसरातही बिबट्याच्या पिल्लाचे दर्शन

या बिबट्याने परिसरातील वस्तीमधील चारय्पाच कुत्र्यांचा फडशा पाडला असून या वस्त्यांमधील नागरिक आता भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. वनविभागाने लवकरात लवकर बिबट्याला पकडावे, अशी मागणी करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी दिसलेले बिबट्याचे ठसे हे लिंक रोडवरील खान वस्तीच्या शेजारील ओढ्यालगतच्या रस्त्यालाच दिसून आले होते. साईबन परिसरात शनिवारी (दि.१६) बिबट्याच्या पिल्लाचे दर्शन झाल्याची माहिती मिळत असून या परिसरात उसाचे क्षेत्र मोठे आहे. रेल्वेलाईनलगत असलेल्या उसाच्या शेतात या पिल्लाचे दर्शन झाल्याचे सांगण्यात येत आहे.