चौपाटी कारंजा मित्र मंडळातर्फे शहरातील स्वावलंबी महिलांचा सन्मान

0
40

नगर – नुकत्याच झालेल्या महिला दिनानिमित्त चौपाटी कारंजा मित्र मंडळाच्या वतीने शहरातील कष्टकरी, स्वावलंबी व सक्षम महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये गेल्या २५ वर्षांपासून दत्त मंदिरात हार फुलं विकून कुटुंबाची आर्थिक बाजू सांभाळणार्‍या निर्मला आंबेकर, पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढून रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणार्‍या नीलिमा खरारे, कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीत फुगे विकून कुटुंबाला हातभार लावणार्‍या राणी कडव, चितळे रोड परिसरात सर्वांना पोहोच चहा देऊन स्वावलंबनाने जगणार्‍या योगिता सोंनिस, पोपकॉर्न व्यवसात स्वतः ची ओळख निर्माण करणार्‍या प्रज्ञा जोशी, दुकानात काम करून कुटुंबाला हातभार लावणार्‍या मंगल विधाते आदी स्वावलंबी सक्षम महिलांचा कृतज्ञता पूर्वक शाल, श्रीफळ व भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला. चौपाटी कारंजा मित्र मंडळाच्या महिला सदस्या दीपाली भळगट, प्राजक्ता भंडारे, रोहिणी पुंडलिक, हर्षदा गुंदेचा, सविता जोशी, श्रीमती डागवाले यांच्या हस्ते सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला. सुरवातीला चौपाटी कारंजा चौकातील मंदिरात श्रीगुरु दत्तात्रयांची महाआरती सर्व महिलांच्या हस्ते करण्यात आली. मंडळाचे कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. पराग देशमुख यांचे सहकार्य लाभले.

अ‍ॅड. पराग देशमुख म्हणाले, चौपाटी कारंजा मित्र मंडळ कायमच अनोखे व वैशिष्ट्यपुणे सामाजिक उपक्रम राबवत आहेत. कौटुंबिक जबाबदारी सांभाळत उदरनिर्वाह करणार्‍या महिलांचा सन्मान करून मंडळाने स्तुत्य उपक्रम राबवला आहे. या सन्मानामुळे या महिलांना अधिक प्रेरणा मिळणार आहे. स्वावलंबी व सक्षम महिलांना सन्मानित करण्याचे भाग्य आज मला लाभले आहे. प्रास्ताविकात मंडळाचे अध्यक्ष अमोल भंडारे यांनी विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. यावेळी चौपाटी कारंजा मित्र मंडळाचे महेंद्र ताकपीरे, सूचित भळगट, महेश कुलकर्णी, प्रदीप बोज्जा, सुरेंद्र सोनवणे, सागर रोहोकले, मयूर कुलकर्णी, तेजस वैद्य, पुरुषोत्तम बुरसे, अनंत गोरेगावकर, कृष्णा संबळे, देविदास वैद्य, मयूर जोशी, संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.