भिस्तबाग महालाजवळून बांधकाम साहित्य चोरणारे तिघे जण जेरबंद

0
82

चोरीतील मुद्देमाल हस्तगत; आरोपींत एका अल्पवयीन मुलाचा समावेश

नगर – सावेडी उपनगरातील भिस्तबाग महाल परिसरात बांधकाम साईटवरून इलेट्रिक वस्तु चोरी करणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. सौरभ ज्ञानेश्वर शेळके (वय १९, रा. तपोवन रस्ता, समता कॉलनी, सावेडी), आदित्य संजय नरोटे (वय १८,रा. तपोवन रस्ता, सावेडी) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. संतोष काशिनाथ पादीर (वय ३२, रा. टाकळी खातगाव, ता. नगर) यांचे भिस्तबाग परिसरामध्ये सुरू असलेल्या बांधकाम साईटवरून लाईट फिटींगचे वायर बंडल, बोर्ड स्विच, बोर्ड प्लेट, कटर असा ९४ हजाराचा ऐवज ६ मार्च रोजी चोरी गेला होता. याप्रकरणी पादीर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस अंमलदार संदीप पवार, रवींद्र कर्डिले, भिमराज खर्से, संतोष खैरे, रणजित जाधव, प्रमोद जाधव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड यांचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. पथकाने खबर्‍यामार्फत सदर गुन्ह्यातील संशयितांची माहिती घेतली असता त्यातील संशयित भिस्तबाग महाल परिसरात असल्याची माहिती मिळाली असता तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबूली देत वायरचे बंडल, स्विच बोर्डच्या प्लेटा, लाईटचे स्विच, कटर मशीन असा एकुण १ लाख ४ हजार ६७५ रूपये किमतीचा मुद्देमाल काढून दिला. त्यांना पुढील तपासकामी तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.