भारतीय सिंधू सभा आयोजित सिंधी नाटक ‘वापारीअजी रिटायरमेंट’ला प्रतिसाद

0
38

नगर – महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी, मुंबई व भारतीय सिंधू सभा, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सावेडी रोडवरील माऊली सभागृह, नगर येथे नुकताच उल्हासनगर येथील सिंधी कलाकार संगमच्या कलाकारांना ‘वापारीअजी रिटायरमेंट’ हे मनोरंजक व संदेशप्रधान असे सिंधी नाटक सादर केले, त्याला नगरमधील सिंधी बांधवांनी प्रतिसाद दिला. याप्रसंगी महेश सुखरामानी (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी, मुंबई), सदस्य डॉ.मदन जेसवानी, इंदर आहुजा (उल्हासनगर), सदस्य व भारतीय सिंधू सभेचे जिल्हाध्यक्ष दामोदर बठेजा आदी उपस्थित होते. त्यांचा व कलाकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी महेश सुखरामाणी म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सिंधी साहित्य अकादमी द्वारा स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी व मातृभाषा सिंधी भाषेची बाल व युवा वर्गाला गोडी लागावी, सिंधी समाजाचा इतिहास, सभ्यता, संस्कृती, परंपरा, सणवार आदि विषयांवर नाटिका, सांस्कृतिक कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित केले जात असून, त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून शेवटी युवांनी, पालकांनी मातृभाषेचा दैनंदिन व्यवहारात वापर करावा, असे आवाहन केले.

या दोन अंकी नाटकात नोकरी करणार्‍याला विशिष्ट वयोमानानंतर रिटायरमेंट अर्थात निवृत्ती मिळते, त्याला निवृतीवेतन मिळते व निवृत्तीनंतरचे आयुष्य तो आरामात जगू शकतो, पण व्यापारी हा अहोरात्र कष्ट करतो, खरेदी-विक्री, उधारी-वसुली, स्पर्धा अशा अनेक अडचणींना तोंड देतो, व्यवसायाबरोबर कौटूंबिक, सामाजिक जबाबदार्या पार पाडतो, पण तो व्यापारातून कधीच रिटायर होत नाही. जोपर्यंत हात पाय चालतात तोपर्यंत तो व्यापार करीतच राहतो, असा नाटकाद्वारे व्यापार्‍याची व्यथा व सत्यस्थिती मांडत कलाकारांनी सुंदर सादरीकरण करत प्रेक्षकांची वाह ऽवाह मिळविली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश कुकरेजा, मोती आहुजा, अशोक आहुजा, किशोर रंगलानी, व्दारका किंगर, मन्नू कुकरेजा, राहुल बजाज, मुकेश आसनानी, सागर बठेजा, जय रंगलानी, रुपचंद मोटवाणी, हरगोविंद चिमनानी, सुनिल पमनानी, गोविंद तलरेजा, विकी चुग, मनोज कृपलानी, उत्तम छुटाणी, शाम टेकवानी, प्रेम बजाज, सुनिल दंडवानी, अजय शादीजा, गिरिष नारंग यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन जितेश सचदेव यांनी केले. दामोदर बठेजा यांनी भारतीय सिंधू सभाच्या कार्य, उपक्रमांविषयी माहिती दिली. किशन पंजवानी यांनी आभार मानले.